भुसावळ (प्रतिनिधी) - राज्य परीक्षा परिषद, पुणेमार्फत २८ जून रोजी राज्यातील विविध केंद्रांवर हजारो शिक्षकांची शिक्षक पात्रता परीक्षा (TET) आयोजित करण्यात आली होती. मात्र, परीक्षेच्या आदल्या दिवशी म्हणजेच २७ जून रोजी प्रश्नपत्रिका फुटल्याची घटना उघडकीस आल्यानंतर नियोजित परीक्षा रद्द करण्यात आली. या संदर्भात राज्य परीक्षा परिषदेकडून जारी करण्यात आलेल्या जाहीर प्रकटनातील मराठी भाषेतील गंभीर शुद्धलेखनाच्या चुका आणि भाषिक त्रुटींवरून प्र. ह. दलाल यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. प्रा. दलाल यांनी म्हटले आहे की, अवघ्या १०-१२ ओळींच्या जाहीर निवेदनामध्येही अनेक मराठी शब्द चुकीच्या पद्धतीने लिहिले गेले असून, शासनाने निर्धारित केलेल्या शुद्धलेखन नियमांची पायमल्ली करण्यात आली आहे. "जाहीर प्रगटन" ऐवजी "जाहीर प्रकटन", तसेच "परीक्षा" आणि "परिक्षा", "गोपनीय" आणि "गोपनिय" अशा शब्दांच्या लेखनाबाबतही संबंधित अधिकारी संभ्रमात असल्याचे दिसून येते, असा आरोप त्यांनी केला. याशिवाय, पोलिसांनी "धाड घातली" असा उल्लेख करण्यात आल्याबाबतही त्यांनी आक्षेप नोंदवला आहे. "धाड" हा शब्द नकारात्मक उद्देशांसाठी वापरला जातो, तर कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी पोलिस "छापा" टाकतात, असा अर्थभेदही त्यांनी स्पष्ट केला. विशेष बाब म्हणजे, हीच यंत्रणा राज्यातील हजारो उच्चशिक्षित आणि अनुभवी शिक्षकांच्या मराठी विषयातील गुणवत्ता व पात्रतेची चाचणी घेणार असल्याने, ही बाब मराठी भाषकांसाठी दुर्दैवी असल्याची टीका प्र. ह दलाल यांनी केली आहे. प्रश्न केवळ या एका पत्रकापुरता मर्यादित नसून, शिष्यवृत्ती परीक्षा, दहावी-बारावीच्या शालांत परीक्षा, शिक्षक प्रशिक्षणासाठीच्या पुस्तिका तसेच परिषदेमार्फत घेतल्या जाणाऱ्या इतर परीक्षांच्या प्रश्नपत्रिकांमध्येही अशाच प्रकारच्या गंभीर भाषिक चुका आढळत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. "अभिजात मराठी भाषेची अशी लक्तरे काढणाऱ्या विद्वान मंडळींना त्रिवार वंदन आणि त्यांच्याकडून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षणाची अपेक्षा करणाऱ्या शिक्षण विभागालाही शतशः नमन," अशा उपरोधिक शब्दांत प्र. ह. दलाल यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. – प्र. ह. दलाल (शिक्षकांना वरिष्ठ व निवड श्रेणीसाठी प्रशिक्षण देणारे माजी तज्ज्ञ मार्गदर्शक, राज्य कार्यकारिणी सदस्य, भा.ज.पा. शिक्षक आघाडी, महाराष्ट्र राज्य, भुसावळ)



