पिंप्रीसेकम गावकऱ्यांना पोलीसांकडून अटक ;

( पिंप्रीसेकम ते दिपनगरला जोडणारा पर्यायी रस्ता उड्डाणपुलाचे काम अपूर्ण तर मेन रस्ता फेन्सिंगद्वारे बंद केल्याने पिंप्रीसेकम नागरिक आक्रमक भूमिकेत )

भुसावळ – तालुक्यातील पिंप्रीसेकम परिसरातील शेतकऱ्यांना शेतीसाठी चोवीस तास वीज मिळावी, प्रकल्पामुळे शेती पिकांचे नुकसान होत असून त्याची भरपाई मिळावी, पिंप्रीसेकम ते दिपनगरला जोडणाऱ्या पर्यायी मार्गाचे काम पूर्ण करावे अश्या विविध मागण्यासाठी दिपनगर येथे संघर्ष समिती पिंप्रीसेकम यांचे २३९ दिवसापासून बेमुदत आंदोलन सुरू असुन अद्याप पर्यंत प्रशासनाने यावर तोडगा काढलेला नाही मात्र, आंदोलनकर्ते व परिसरातील विद्यार्थी, नागरिकांना प्रशासन वेठीस धरून त्यांचा येण्याजाण्याचा मार्ग पिंप्रीसेकम ते दिपनगरचा रस्ता फेनसिंग करून दि.८ जानेवारी २०२४ रोजी बंद करत असल्याने याचा जाब विचारण्यासाठी गेले असता त्यांना पोलीस प्रशासनाने अटक केली. सदर मार्ग बंद केल्यास परिसरातील विद्यार्थी व नागरिकांना वरणगाव कडून फिरून जावे लागणार असून पर्यायी मार्ग उड्डाण पुलाचे काम सुद्धा अपूर्ण आहे.
आम्ही कोणत्याही प्रकारचे आंदोलन केले नसून दिपनगर प्रशासनाला आमच्या मागण्या सांगण्यासाठी गेले असता प्रशासन आम्हाला वेठीस धरून पोलिस आम्हाला अटक करत आहे, असा आरोप पिंप्रीसेकम उपसरपंच उज्वला दिलीप तायडे यांनी केला आहे. पिंप्रीसेकम ते दिपनगरला जोडणारा पर्यायी मार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे अन्यथा संघर्ष समिती पिंप्रीसेकमचे आंदोलन तीव्र करण्यात येईल. तर नागरिकानी कोणतीच सूचना न देता प्रकल्पाच्या कामात अडथळा निर्माण केल्यामुळे त्यांना अटक करण्यात येत आहे, असे प्रकल्प अधिकारी इंगळे साहेब म्हणाले. यावेळी दिपनगरचे सुरक्षा अधिकारी, कर्मचारी, एम.एस.एफ.चे सुरक्षा अधिकारी व पोलीस अधिकारी उपस्थित होते.