माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांचे होणार प्रशिक्षणातून सक्षमीकरण

भुसावळ – विद्यार्थ्यांचे सातत्यपूर्ण अध्ययन होऊन मूल्यमापन व्हावे यासाठी नववी ते बारावीच्या शिक्षकांना अध्ययन प्रक्रिया व मूल्यमापनाचे धडे दिले जाणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात नमूद अध्ययन निष्पत्ती व क्षमतांच्या आधारे विद्यार्थ्यांचे अध्ययन कौशल्य विकसित व्हावे हा दृष्टिकोन समोर ठेवून शिक्षक सक्षमीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी शिक्षक प्रशिक्षण घटक संच विकसित करण्यात येत आहे.

प्रत्येक विद्यार्थी शिकावा यासाठी शिक्षकांनी सातत्याने त्यांना शिकवत राहावे असे अपेक्षित नाही तर विद्यार्थ्यांनी स्वयंअध्ययनातूनही शिकले पाहिजे. विद्यार्थ्यांची अध्ययन प्रक्रिया सातत्याने सुरू राहावी आणि त्याने स्वतःच स्वतःचे मूल्यमापन करावे यासाठी सुद्धा विद्यार्थी सक्षम व्हावा या हेतूने शिक्षकांनी सुलभक म्हणून भूमिका बजावण्याची गरज आहे. शिक्षकांनी शिकवल्यानंतरही मुले त्यांच्या गतीने शिकत असतात. त्यामुळे त्यांची अध्ययन गती विकसित होण्यासाठी शिक्षकांनी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले पाहिजे. यासाठी नववी ते बारावीच्या शिक्षकांचे सक्षमीकरण करण्यासाठी शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रशिक्षण घटक संच निर्मितीची कार्यशाळा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे येथे मराठी विभाग प्रमुख डॉ. राजेश बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच पार पडली. शिक्षकांना प्रशिक्षणातून अध्ययन-अध्यापनशास्त्र व मूल्यमापनाचे धडे दिले जाणार असून यात आलेले नवप्रवाह सांगितले जाणार आहे. सोबतच पाठ्यपुस्तक आणि अध्ययन अनुभव यांची सांगड कशी घालता येईल या दृष्टिकोनातून देखील शिक्षकांना प्रशिक्षित करण्यात येणार आहे. प्रारंभी राज्यस्तरावर तज्ज्ञ शिक्षकांना प्रशिक्षित करण्यात येणार असून हे शिक्षक विभागनिहाय प्रशिक्षण देऊन तालुक्यासाठी आवश्यक सुलभकांना प्रशिक्षण देणार आहेत. त्यानंतर तालुक्याच्या ठिकाणी नववी ते बारावीच्या संपूर्ण शिक्षकांना विषयनिहाय प्रशिक्षण दिले जाणार आहे.

आत्मनिर्भर भारत हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात नमूद केलेले एक महत्त्वपूर्ण तत्त्व आहे. या दृष्टिकोनातून विद्यार्थी देखील भविष्यासाठी तयार व्हावा, यासाठी विविध क्षेत्रात सातत्याने होणारे बदल व नवनवीन होणारे संशोधन यांना सामोरे जाण्यासाठी शिक्षक व विद्यार्थी यांची तयारी असायला हवी. पाठ्यपुस्तकीय ज्ञान ग्रहण करण्यासोबतच भविष्यातील व्यावसायिक संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध व्हाव्या यासाठी शिक्षकांचा व्यावसायिक विकासही होणे गरजेचे आहे. तेव्हाच शिक्षक व विद्यार्थ्यांचे अध्ययन-अध्यापन परिणामकारक होऊन शिक्षण प्रणालीमध्ये सुधारणा होतील.

अध्ययनाची प्रक्रिया नाविन्यता आणणारी – अध्ययन-अध्यापनाची विविध तंत्रे वापरून विद्यार्थ्यांचे शिकणे आनंददायी होण्यासाठी शिक्षकांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. त्यासाठी शिक्षकांनी आपल्या अध्यापनाच्या प्रक्रियेत अध्ययनाला महत्त्वपूर्ण स्थान दिल्यास अध्ययन-अध्यापनाची प्रक्रिया विद्यार्थ्यांमध्ये नाविन्यता आणणारी ठरणार आहे. तसेच मूल्यमापनाचे नवनवीन आयाम विद्यार्थ्यांमध्ये रूजवण्यासाठीही शिक्षकांनी बदललेल्या मूल्यमापन पद्धतीचा दृष्टिकोन लक्षात घेणे गरजेचे असल्याचे प्रशिक्षण घटक संच निर्मिती तज्ज्ञ डॉ. जगदीश पाटील यांनी सांगितले.

फोटो ओळी –
प्रशिक्षण घटक संच निर्मिती कार्यशाळेत सहभागी तज्ज्ञ शिक्षक