भुसावळ – येथील श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स व टेलीकम्यूनिकेशन विभागाच्या वतीने इलेक्ट्रॉनिक्स व टेलीकम्यूनिकेशन क्षेत्रातील जागतिक बाजारपेठेतील कल, बदल, मागणी आणि संधी या विषयावर चर्चा सत्र घेण्यात आले.
या प्रसंगी राज्य, देश तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर होऊ घातलेल्या उद्योग, व्यापार, संशोधन व शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडींचा उहापोह करण्यात आला.
कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी प्राचार्य डॉ. आर. बी. बारजिभे यांनी संपूर्ण जगभरात इलेक्ट्रॉनिक चिप व सेमी कंडक्टर उत्पादन ह्याला प्राधान्य देत इलेक्ट्रॉनिक्स उद्योगवाढीला प्रचंड चालना देण्यात येत आहे तसेच फाइव-जी तंत्रज्ञान तसेच इलेक्ट्रॉनिक्स विषयीचे नवीन राष्ट्रीय धोरण यांमुळे अनेक संधी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्यूनिकेशन क्षेत्रात उपलब्ध होतील. असे सांगितले. विभाग प्रमुख डॉ. गिरीश कुलकर्णी यांनी देश पातळीवरील घडामोडी पाहता लवकरच इलेक्ट्रॉनिक आणि कारमध्ये आवश्यक असलेले सेमीकंडक्टर आणि चिपचे उत्पादन देशात सुरु होईल. आणि ह्यासाठी सरकारमार्फत चिप मॅन्युफॅक्चरिंग हब (Chip Manufacturing Hub) तयार करण्यासाठी 76 हजार कोटींची योजना आखण्यात आली आहे. या योजनेतून देशात चिप उत्पादन करणा-या कंपन्यांना सबसिडी तर देण्यात येणार आहेतच पण सवलतीही देण्यात येणार आहे. त्यामुळे चिप आणि सेमीकंडक्टर उत्पादनात भारत आत्मनिर्भर होईल आणि कोअर इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात तसेच फाइव जी तंत्रज्ञानामुळे टेलीकॉम क्षेत्रात मोठ्या संधी निर्माण होऊ घातल्याचा अभ्यास मांडला.
प्रा. ए.एस.भिडे आणि प्रा. डी.जी.अग्रवाल यांनी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आणि उपकरणे यांचा सगळ्यात मोठा वापरकर्ता असणाऱ्या आपल्या देशात वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात लागणाऱ्या टीव्ही, रेडिओ, टेलिफोन, मोबाइल, एअर कंडिशनर, कम्प्युटर, लॅपटॉप, आयपॅड, फुड प्रोसेसर, रेफ्रिजरेटर यासह इतर इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आणि उपकरणे यातील इलेक्ट्रॉनिक्स पार्ट्स व कॉम्पोनंटस योग्य प्रमाणात निर्माण होत नव्हते. रेल्वे, ट्रान्सपोर्ट, गेम्स, खेळणी, एअरलाइन्स, डीफेन्स, टेलिकम्युनिकेशन, ऊर्जा, आयटी यासारख्या असंख्य क्षेत्रांमधील विविध सुटे पार्ट्स बनविणाऱ्यांना मुख्य भाग हा चीनमधूनच आयात होत होता. तसेच सर्व स्वयंचलित इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा प्राण म्हणून ओळखली जाणारी इलेक्ट्रोनिक चीप अर्थात आय. सी. उत्पादनासाठी सुद्धा तैवान किंवा चीन ह्या देशांवर आपले अवलंबीत्व होते. मात्र ही परिस्थिति बदलण्यासाठी केंद्र सरकारने आखलेल्या धोरणानुसार भारतात आठ इलेक्ट्रॉनिक हब विकसित होत आहेत. त्यामुळे प्रशिक्षित इलेक्ट्रॉनिक्स व टेलीकम्यूनिकेशन अभियंत्यांना मोठी संधि निर्माण झाली आहे असे निरीक्षण नोंदवले.
प्रा. एस. एम. शिंदे, डॉ. नीता नेमाडे यांनी इलेक्ट्रॉनिक्स व टेलीकम्यूनिकेशन विषयातील पदवी कोअर इलेक्ट्रॉनिक्स, टेलीकम्यूनिकेशन क्षेत्र, आय.टी, सॅटलाइट कम्युनिकेशन, ऑटोमेशन, एम्बेडेड सिस्टम, ऑटोमोटीव इलेक्ट्रॉनिक्स अश्या अनेक क्षेत्रात रोजगारासाठी उपयोगी ठरते आणि त्यामुळे भविष्यात एखाद्या क्षेत्रात मंदी किंवा ले-ऑफ ची परिस्थिति निर्माण झाली तरी इलेक्ट्रॉनिक्स व टेलीकम्यूनिकेशन विषयातील पदवीधारक अभ्यासक्रमातील लवचिकतेमुळे तग धरून राहून शकतो. त्यामुळे मुले तसेच मुलींनी ह्या क्षेत्राकडे अधिकाधिक वळण्याची गरज असल्याचे सांगितले.
भारत तसेच जागतिक पातळीवर सुद्धा इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात प्रचंड बदलाचे वारे वाहत असून अफाट संधी आणि अमर्यादित प्रगतीची दारे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्यूनिकेशन क्षेत्र उघडून देईल असे प्रा. गजानन पाटील यांनी सांगितले.
हिन्दी सेवा मंडळाचे अध्यक्ष डॉ. रविकांत परदेशी, सचिव श्रीमती. एम.डी.शर्मा, कार्याध्यक्ष सत्यनारायण गोडयाले, कोशाध्यक्ष एम.डी.तिवारी, रमेश नागराणी, संजय नाहटा, बिसन अग्रवाल,पंकज संड यांनी ह्या उपक्रमाचे कोतूक केले.



