माऊंट आबू येथील राष्ट्रीय परिषदेत माध्यमांची जबाबदारी या विषयावर चिंतन : देशभरातील तज्ज्ञांनी केले मार्गदर्शन : भुसावळ परिसरातील दहा जणांचा सहभाग :

भुसावळ – राजस्थान राज्यातील माऊंट आबू येथील ज्ञान सरोवर येथे प्रजापिता ब्रह्माकुमारीज केंद्रातर्फे नुकतीच मीडिया कॉन्फरन्स पार पडली. राष्ट्रीय विकासात माध्यमांची जबाबदारी या विषयावरील राष्ट्रीय परिषदेमध्ये देशभरातील विविध तज्ज्ञांनी नानाविध विषयांवर मार्गदर्शन केले. या परिषदेत भुसावळसह परिसरातील दहा जणांनी यशस्वी सहभाग नोंदविला.

विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींसाठी प्रजापिता ब्रह्मकुमारीज केंद्रातर्फे माऊंट आबू येथेे वर्षभर मार्गदर्शनपर शिबिरे आयोजित करण्यात येतात. कोविड कालावधीनंतर प्रथमच माऊंट आबू येथील ज्ञान सरोवरमध्ये राष्ट्रीय पातळीवरील मीडिया कॉन्फरन्स पार पडली. राष्ट्रीय विकासात माध्यमांची जबाबदारी या विषयावर आयोजित पाच दिवसीय परिषदेत अनेक विषयांवर मंथन झाले. भुसावळ येथील प्रजापिता ब्रह्माकुमारीज केंद्राच्या प्रमुख बीके सिंधू दीदी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. श्रीकांत जोशी, विजयकुमार ठक्कर, दिलीप वैद्य, डॉ. जगदीश पाटील, प्रकाश पाटील, प्रा. उमाकांत पाटील, हेमेंद्र नगरिया, संजय ताडेकर, संजीव बोठे, तुलसीदास महाजन अशा दहा जणांच्या चमूने परिषदेत यशस्वी सहभाग नोंदविला. राष्ट्रीय पातळीवरील परिषदेत आयोजित दिवसभरातील कार्यशाळांमध्ये विविध विषयांवर मंथन करण्यात आले. त्यात आपल्या अंतर्मनाचा शोध घेणे, राष्ट्रीय विकासात माध्यमांची जबाबदारी, मीडियाची नैतिक समस्या – उपाय, सकारात्मक आणि निरोगी जीवनशैली : तणावमुक्त जगणे, परमात्म्याला समजून घेणे, सोशल मीडियाचे फायदे आणि तोटे : वर्तमान परिस्थिती, मीडियाच्या विश्वासार्हतेचे संकट : कारण आणि परिणाम, मीडिया व्यवसायात स्वयं-सशक्तीकरण : उत्कृष्टतेची गुरुकिल्ली, मूल्यावर आधारित राष्ट्रनिर्मितीसाठी मीडिया मिशन, राजयोगाची कला आणि विज्ञान या विषयावर भारतभरातील तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले. परिषदेत सहभागी झाल्याबद्दल प्रत्येक सहभागी व्यक्तीला मीडिया विंगचे चेअरमन बीके करूणा व व्हाईस चेअरमन बीके आतम प्रकाश यांच्या स्वाक्षरीचे सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले.

भुसावळ केंद्रातही प्रमाणपत्र प्रदान –

भुसावळ येथील प्रजापिता ब्रह्मकुमारीज केंद्रातर्फे पाठवण्यात आलेल्या चमूने केंद्रात आयोजित सकाळच्या सत्रातील कार्यक्रमाला भेट दिली. याप्रसंगी डॉ. जगदीश पाटील, प्रा. श्रीकांत जोशी, संजय ताडेकर व संजीव बोठे यांनी मनोगत व्यक्त केले आणि आपला माऊंट आबू येथील मीडिया कॉन्फरन्स व प्रजापिता ब्रह्मकुमारीज केंद्राबद्दलचा अनुभव सांगितला. यानंतर परिषदेत सहभागी झालेल्या सहभागींना प्रजापिता ब्रह्माकुमारीज केंद्राच्या प्रमुख बीके सिंधू दीदी यांच्या हस्ते सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले.