चार वर्षाचा कालावधी होवूनही अनामत रक्कम मिळेना – साकेगांव ग्रामपंचायत विरोधात गटविकास अधिकारी यांचेकडे तक्रार :



भुसावळ – गावातील पाणी पुरवठा योजनेच्या कामासाठी गावातील एका नागरीकाने ग्रामपंचायतीला उधार म्हणून २ लाख ३२ हजार रुपयांची अनामत रक्कम दिली . मात्र, चार वर्षाचा कालावधी होवूनही ग्रामपंचायती कडुन अनामत रक्कम परत मिळाली नाही . यामुळे अनामत रक्कम धारकाने गटविकास अधिकारी यांचेकडे वारंवार तक्रार करूनही त्याचा फारसा उपयोग होत नसल्याने अनामत रक्कम धारक हतबल झाले आहेत .

तालुक्यातील साकेगाव येथील ग्रामस्थांना कुपनलिकेतील क्षारयुक्त पाण्याचा पुरवठा केला जात होता . यामुळे नागरीकांना जलजन्य आजाराचा सामना करावा लागत असल्याने गावाला महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या लगतच्या तापी नदी पात्रातुन जल वाहीनीद्वारे पाणी पुरवठा करण्याचा ग्रामपंचायतीमध्ये ठराव करण्यात आला . मात्र, यासाठी ग्रामपंचायतीकडे निधी उपलब्ध नसल्याने आर्थिक अडचण निर्माण झाली होती . यामुळे गावातीलच रहीवासी निवृत्ती रामा पवार यांनी पुढाकार घेऊन गावातील पाण्याची समस्या तातडीने मार्गी लावण्यासाठी ग्रामपंचायतीकडे ८ ऑक्टोंबर २०१८ रोजी २ लाख ३२ हजार ५०० रुपये अनामत रक्कम उधार म्हणून जमा केल्याने गावात तापी नदी पात्रातील पाण्याचा पुरवठा सुरु झाला आहे. याबाबत त्यांना ग्रामपंचायतीने अनामत रक्कमेची रितसर पावतीही दिली असून यानंतर त्यांनी ग्रामपंचायतीकडे आपल्या उधार दिलेल्या अनामत रक्कमेची वारंवार मागणी केली . मात्र, ग्रामपंचायती कडुन त्यांच्या या मागणीकडे चार वर्षापासुन दुर्लक्ष होत असल्याने त्यांनी भुसावळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांचेकडे अनामत रक्कम परत मिळावी यासाठी निवेदन दिले आहे . मात्र, पंचायत समिती विभागातुनही त्यांच्या निवेदनाची दखल घेतली जात नसल्याने ते आर्थिक अडचणीमुळे चांगलेच हतबल झाले आहेत . तर ग्रामपंचायतकडे सद्यस्थितीत निधी उपलब्ध नसल्याचे सरपंच यांनी सांगितले .