सक्षम नारी फाउंडेशन व मानवीय एकता गृप यांच्या संयुक्त विद्यमानाने हळदी कुंकू सण साजरा : विधवा व परितक्त्या महिलांनीं लुटले सौभाग्याचे वाण :

भुसावळ – मकर संक्रांतीचे औचित्य साधून रूढि परंपरा यांना फाटा देत अनोखा व आधुनिक पद्धतीने सक्षम नारी फाउंडेशन व मानवीय एकता गृप यांच्या संयुक्त विद्यमानाने विधवा व परितक्त्या महिलांना हळदी कुंकू व सौभाग्याचे वाण देवून संक्रांत समारंभ साजरा करण्यात आला.
संक्रात आल्यावर सर्व महिलांना वेध लागते ते हळदीकुंकू समारंभाचे. मग मोठ्या उत्साहात त्या काळी साडी नेसून, लाल टिकली लाऊन हा समारंभ साजरा करतात. पण ह्यामध्ये आपल्याच सख्या ज्यांचे पती हयात नाहीत, किंवा ज्यांना मासिक पाळी आली आहे अशा स्त्रियांना दूर ठेवले जाते. याच रुढी परंपरांना छेद देत आजचा कार्यक्रम संपन्न करण्यात आला. एकल पालकत्व असलेल्या भगिनी ज्यांनी स्वकर्तुत्वाने आपल्या कुटुंबांची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली अशा 10 स्त्रियांचा यावेळी साडी देऊन व ओटी भरून मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. जेष्ठ समाजसेविका उषा पाटील यांनी स्त्रियांना आपापसातील हेवे मिटवून आपण सर्व एक आहोत याची जाणीव ठेवण्याचे आवाहन केले. केवळ कपाळावर टिकली लावून उपयोग नाही तर शिकली तरच टिकली हेही त्यांनी सोदाहरण समजाविले. सामाजिक कार्यकर्त्या शैला सावंत यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. डॉ. सुवर्णा गाडेकर ह्यांनी महिलांना आरोग्यविषयक तसेच मासिक पाळीविशयी शास्त्रोक्त मार्गदर्शन केले. सुत्रसंचालन शीतल मोरे ह्यांनी तर आभार प्रदर्शन पल्लवी अंबाडे ह्यांनी केले. महिलांना महिला म्हणून सन्मान देणा-या या आगळ्या वेगळ्या तिळगुळ समारंभाला महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमात सुमारे 200 महिला सहभागी झाल्या.
दरम्यान महिलांच्या आरोग्यासाठी अर्पण हॉस्पिटल तर्फे उपस्थित सर्व महिलांचे ब्लड प्रेशर व हिमोग्लोबीनची तपासणी करण्यात आली.
सत्काराने महिला गेल्या भारावून –
प्रसंगी सत्कारार्थी भगिनी मध्ये
सुनंदाताई डांगे ,अश्विनीताई कासार , जयश्री जगताप ,
सुनीता विनंते, प्रभा बोरनारे
उज्वला शिवपुजे , दुर्गाताई वाढे
सीता ठाकूर , सुनीता साकलकर यांचा सत्कार झाला यावेळी सत्काराने महिला भारावून गेल्या होत्या. त्यांनी आपले मनोगत व्यक्त करून आयोजकांचे आभार मानले. उपस्थित महिलांपैकी आश्विनी हिनेही आपले मनोगत मांडले. कार्यक्रम यशस्वितेसाठी शैला सावंत,संगिता जगताप, शीतल मोरे, शीतल भालेराव, सुनिता जोशी, पल्लवी अंबाडे, गायली विसपुते, सुनंदा डांगे, वंदना कांबळे, डॉ. वैशाली रामवंशी व डॉ. सुवर्णा गाडेकर ह्यांनी परिश्रम घेतले.