भुसावळ : केंद्रीय समाज कल्याण मंत्री व रीपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सुमारे 500 महिलांना साडीचोळी वाटपाचा स्तुत्य उपक्रम भुसावळ तालुक्यातील कंडारी येथे रीपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जिल्हाध्यक्ष राजूभाऊ सूर्यवंशी यांनी राबवला. या उपक्रमाचे जिल्ह्यात सर्वत्र कौतुक होत आहे.
रीपाइं जिल्हाध्यक्ष राजूभाऊ सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या कार्यक्रमास दीपक मगर, पप्पू सुरडकर, शरद सोनवणे, बाळू सोनवणे, सुनील देवरे, गोलू रायसिंग पंडित, विश्वास खरात व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंत्री .आठवले यांच्या वाढदिवसाचे बॅनर, पोस्टर न लावता सामाजिक उपक्रम राबवून माता व भगिनींना 500 महिलांना साडी-चोळीचे वाटप करण्यात आले.

रीपाइं जिल्हाध्यक्ष राजूभाऊ सूर्यवंशी म्हणाले की, मंत्री रामदास आठवले हे संघर्ष करणारे नेता असून त्यांनी रीपाइं वाढवली, आंबेडकर चळवळीला पुढे नेण्याचे काम केले व आंबेडकरी जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी सतत लढा देत राहिल्यानेच त्यातूनच ते केंद्रीय राज्यमंत्री, समाज कल्याण मंत्री पदापर्यंत पोहोचले. यापुढेदेखील ते मोठ्या पदावर निश्चित जातील, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. त्यांनी अनेक वेळा आमदारकी, मंत्रीपद भोगले. त्यांनी आंबेडकरी चळवळीचे प्रेम भावना जिंकून पक्षाची बांधणी केली. ही सर्व अभिमानाची गोष्ट आमच्यासाठी असल्यानेच जिल्ह्याच्या वतीने हा वाढदिवस साजरा करीत असल्याचे सूर्यवंशी म्हणाले.


