मुंबई : राज्यातील 92 नगरपालिका आणि 4 नगरपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता व 18 ऑगस्ट रोजी निवडणुकीची तारीखही जाहीर झाली होती मात्र या निवडणुका आता अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत तर ज्या क्षेत्रात आचारसंहिता जाहीर होती होती ती आपसुकच संपुष्टात आली आहे. याबाबतचे आदेश गुरुवार, 14 जुलै रोजी राज्य निवडणूक आयोगाचे अवर सचिव संजय सावंत यांनी काढले आहेत.
ओबीसी आरक्षणानंतर निवडणुका शक्य !
ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर सुप्रीम कोर्टात गत मंगळवार, 12 जुलै रोजी महत्त्वाची सुनावणी झाली होती. राज्य सरकारने बांठिया आयोगाचा अहवाल सादर केला आहे. या पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टातील सुनावणीकडे सगळ्या राज्याचे लक्ष लागले होते. ओबीसी आरक्षणासाठी आवश्यक असणारी ट्रिपल टेस्ट पूर्ण केली असल्याचे राज्य सरकारने सुप्रीम कोर्टाला सांगितले. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने जाहीर झालेल्या निवडणूक कार्यक्रमात कोणताही बदल न करण्यास सांगितले. त्याशिवाय, नवीन निवडणुका जाहीर न करण्याचे निर्देश दिले होते त्यामुळे दिलेल्या तारखेलाच निवडणुका होतील, अशी शक्यता वर्तवली जात होती मात्र गुरुवारी निवडणूक आयोगाने काढलेल्या आदेशात निवडणुका पुढे ढकलल्याचे जाहीर केल्याने 18 ऑगस्ट रोजी होणार्या निवडणुकीच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. दरम्यान, ओबीसी आरक्षणाबाबतची सुनावणी 19 जुलै रोजी होणार असून या सुनावणीत नेमका काय निर्णय होतो? याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. बांठीया आयोगाच्या आधारे ओबीसींना आरक्षण मिळणार का, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.



