भुसावळातील प्रा. डॉ. दयाघन राणे यांनी टाकावू पदार्थांपासून तयार केली बायोएन्जाइमची निर्मिती :

भुसावळ -  फेकून देण्यात येणाऱ्या मोसंबी च्या साली, वापरण्या योग्य नसलेला जुना गूळ आणि पिण्याच्या पाण्यासाठी वापरली जाणारी प्लास्टिकची बाटली यांचा उपयोग करत भुसावळ येथे वास्तव्यास असणाऱ्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव च्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे माजी जळगाव जिल्हा समन्वयक प्रा डॉ दयाघन एस राणे यांनी नुकतेच बायोएन्जाइम यशस्वीरीत्या तयार केलेले आहे. 
   बदलत्या जीवन शैली मध्ये आरोग्यदायक तसेच शक्तिदायक पेय म्हणून संत्री, मोसंबी, अननस अश्या फळांचा चा ज्यूस  घेण्याकडे सध्या कल आहे. त्या साठी घरी तयार करून किंवा स्टॉल वर जावून नागरिक अश्या प्रकारचे ज्यूस घेत असतात. रस काढून घेतल्यावर फळांचा उरणारा चोथा आणि साली फेकून दिल्या जातात. तसेच बाटलीबंद पाणी घेऊन पिल्यावर रिकामी बाटली फेकून दिली जाते, तश्या प्रकारच्या फेकलेल्या बाटल्यांपासून होणारे प्लास्टिक चे प्रदुषण दीर्घकाळ टिकणारे असते. प्रा. डॉ. दयाघन राणे यांनी अश्याच प्रकारे फेकून दिलेल्या बाटलीचा वापर करून तीन मोसंबीच्या एकशे चाळीस ग्रॅम साली, वापरण्या योग्य नसलेला जुना गूळ चाळीस ग्रॅम आणि अर्धा लिटर पाणी घेऊन घरीच बायोएन्जाइम ची निर्मिती केली आहे. हे बायोएन्जाइम तयार करणे सोपे वाटत असले तरी योग्य वेळा त्यामधील गॅस बाहेर काढणे, त्याचा हवेशी जास्त संपर्क होऊ न देणे या गोष्टी अनेक प्रयत्न केल्यावरच साध्य होतात.
 बायोएन्जाइम ची निर्मिती नव्वद दिवस चालणाऱ्या रासायनिक प्रक्रियेमधून होते. एक भाग जुना गूळ, तीन भाग निंबूवर्गीय फळांच्या साली आणि दहा भाग पाणी असे मिश्रण प्लास्टिक च्या अरुंद तोंडाच्या बाटली मध्ये भरून ती हवाबंद करून ठेवली जाते. सुरुवातीच्या पहिल्या आठवड्यात त्या मध्ये तयार होणारा गॅस रोज बाटली चे झाकण थोडे ढिले करत काढावा लागतो. त्या साठी बाटली भरत असताना वरचा तीन ते चार इंच भाग रिकामा ठेवावा लागतो. नंतर महिना भर साधारण दोन दिवसांनी आणि त्या नंतर चार ते पाच दिवसांनी हा गॅस काढल्या नंतर नव्वद व्या दिवशी रूम फ्रेशनर सारख्या सुगंधाचे  बायोएन्जाइम तयार होते असे प्रा. डॉ दयाघन राणे यांनी सांगितले.
 हे बायोएन्जाइम स्ट्रॉंग असल्यामुळे एक लिटर पाण्यात केवळ तीन ते दहा मिलीलिटर येवढ्या कमी मात्रेत घेवून आठवड्यातून एक किंवा जास्तीत जास्त दोन वेळा टेरेस गार्डन मधील झाडांवर फवारायचे असते. किंवा जमिनीतून खत म्हणून देताना एक कप  बायोएन्जाइम पंधरा लिटर पाण्यात मिसळून देता येते. टाकावू पदार्थांपासून तयार केलेले असल्यामुळे त्याची किंमत अत्यंत कमी असते. बायोएन्जाइम मुळे झाडांची/ रोपांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते ज्या मुळे झाड सुदृढ तसेच चमकदार बनते. या व्यतिरिक्त बायोएन्जाइम चा उपयोग किचन ओटा, किचन, बाथरूम टॉयलेट मधील टाईल्स स्वच्छ करण्यासाठी, भांडी घासण्यासाठी, हात धुण्यासाठी त्याच बरोबर घराबाहेर गटार तुंबलेले असल्यास त्यात दर आठवड्यातून एक वेळा टाकल्यास त्यात घातक बॅक्टेरीया तयार होत नाहीत ज्या मुळे आपले आरोग्य सुरक्षित राहते. बायोएन्जाइम तयार झाल्यानंतर शिल्लक राहिलेल्या  सालिंच्या चोथ्याला कडक उन्हात वाळवून त्या मध्ये रिठ्याच्या साली घालून हे मिश्रण मिक्सर मध्ये बारीक केल्यास ही पावडर भांडी स्वच्छ धुण्यासाठी ही वापरली जाऊ शकते 
  साधारणपणे आपण अन्न खाताना चावून खातो म्हणून अन्नपचन लवकर आणि चांगल्या पद्धतीने होते. त्याच प्रमाणे बायोएन्जाइम मध्ये जी रसायने आणि जिवाणू असतात ते जमिनीमधील  जिवाणूंना कृतिशील बनवतात. त्यामुळे जमिनीतील झाडांची अन्नद्रव्ये बारीक होऊन पिकांना शोषून घेणे सोपे होते आणि झाडे किंवा रोपे सुदृढ होतात. मिरची, टोमॅटो यांसह इतर झाडांमधून फुले गळण्याचे प्रमाण कमी होऊन फळधारणा वाढते. रोपांवर कीड पडू नये म्हणून लसूण आणि हिरवी मिरची चे बायोएन्जाइम तयार केल्यास ते उत्तम नैसर्गिक कीडनाशक म्हणून काम करते.
  बायोएन्जाइम तयार करताना लहान किंवा अरुंद तोंडाची प्लास्टिक बाटली वापरावी. मोठ्या झाकणाची बाटली घेतल्यास त्या मधील गॅस बाहेर काढताना हवेचा संपर्क होऊन बाटली मध्ये फंगस तयार होते. म्हणून बाटली चे तोंड जेवढे लहान तेवढी ती जास्त चांगली. या मध्ये वापरण्यात आलेला गूळ जुना, वापरण्या योग्य नसला तरी चालतो कारण त्याचा वापर केवळ किण्वन क्रियेसाठी करायचा असतो.  
 बायोएन्जाइम तयार झाल्यावर बाटली मधील उरलेला चोथा कंपोस्ट खत तयार करण्यासाठी वापरला तर कंपोष्ट खत लवकर तयार होते. तसेच हे बायोएन्जाइम ही कंपोष्ट खत तयार एक लिटर पाण्यात पाच मिलीलिटर या प्रमाणात फवारले तर कंपोष्ट लवकर तयार होते.                        
  बाजारातून आपण जी फळे आणि भाजीपाला आणतो त्यावर बरीच रसायने फवारलेली असतात. त्या रसायनांचा आपल्या शरीरावर परिणाम होऊ नये यासाठी एक लिटर पाण्यात तीस मिलीलिटर बायोएन्जाइम टाकून त्या मिश्रणात फळे आणि भाजीपाला अर्धा तास भिजवले तरी रसायनाचे घातक परिणाम आपल्या शरीरावर होत नाहीत. 
  साधारण एक मोसंबी किंवा संत्री पासून चाळीस ते साठ ग्रॅम साले मिळतात. ज्या फेकून दिल्या जातात. त्या पेक्षा थोडासा गूळ, किचन मध्ये वाया जाणारे भाजीपाल्याचे टाकावू भाग आणि निरुपयोगी प्लॅस्टिकची बाटली यांचा वापर केल्यास परिसर स्वच्छ राहतो, आपले आरोग्य निरामय राहायला मदत होते त्या सोबतच विषमुक्त भाजीपाला आपल्या परसबागेमधून आपल्याला उपलब्ध होतो. 
 चला आपण सर्वजण स्वच्छतेच्या माध्यमातून पर्यावरणातील प्रदूषण दूर करत विषमुक्त भाजीपाल्याची निर्मिती करून निरामय जीवन जगू या !

आपल्या घरा पासून स्वच्छता राखत आपल्या शहराला स्वच्छ राखत स्वच्छ भारत मोहिमेला बळ देवू या !!
प्रा. डॉ. दयाघन एस राणे, भुसावळ 9834831870