भुसावळ – ज्ञान, वैराग्य पुन्हा समर्थ होण्यासाठी सत्कर्माची गरज असते. सत्कर्माचे अनेक प्रकार ऋषींनी मानवांना सांगितले आहे. ते अतिशय कष्टाचे आणि स्वर्गप्राप्तीचीच त्यात आशा असते. द्रव्ययज्ञ, ज्ञानयज्ञ यांचे फळ म्हणजे स्वर्ग. परंतु भक्तीचे साधन त्यापेक्षा श्रेष्ठ असल्याने मोक्ष देणारे आहे. श्रीमद्भागवत ग्रंथाचे पारायण करण्याने कलियुगाचे सारे दोष नष्ट होतात, असे प्रतिपादन कथा प्रवक्ते श्रीहभप लक्ष्मण महाराज चिखलीकर यांनी केले.
भुसावळ येथील विकास कॉलनीत दिलीप कडू मुऱ्हे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित श्रीमद् भागवत सप्ताहात लक्ष्मण महाराज कथा प्रवक्ते आहेत. हा सप्ताह दि. 25 मे ते 1 जूनदरम्यान सुरू आहे. सप्ताहात पराग महाराज, चंद्रकांत महाराज, भरत महाराज, दीपक महाराज, संजय महाराज, आर.ए. पाटील महाराज, शरद महाराज यांची कीर्तने होत असून शेवटच्या दिवशी महेंद्र महाराज यांचे काल्याचे कीर्तन होईल. पहिल्या दिवशी कथेदरम्यान हभप लक्ष्मण महाराज म्हणाले की, व्यासांनी श्रीमद् भागवत कथेची रचना केली. भागवतात बारा स्कंद असून शुक व परीक्षित यांचा संवाद आहे. श्रीमद् भागवत कथा श्रवणाने अत्यंत पापी माणसांचा सुद्धा उद्धार होतो. भागवतामुळे भक्ती, ज्ञान व वैराग्य यांची प्रतिष्ठापना होते. त्याचे श्रद्धापूर्वक स्मरण केले तर मानव मुक्तीचा अधिकारी होतो. भागवत कथेत सारी पुराणे, नाना प्रकारची तत्वज्ञाने व दैवतांची उपासना सांगितली आहेत. एक सप्ताहपर्यंत भागवताचे श्रवण करावे. अल्प आयुष्य, अल्प बल, अल्पमती हे कलियुगातील मानवाचे वैशिष्ट्ये आहे तर हरीस्मरणाने व भागवत श्रवणाने मोक्ष हे कलियुगाचे वैशिष्ट्य आहे. भागवत कथा सप्ताहाने भक्तीचा उदय होतो. हरीस्मरणात मन लागते. कलिमल धुऊन निघतो. सत्य, त्रेता व द्वापारयुगात ज्ञान आणि वैराग्य ही मुक्तीची साधने होती. परंतु कलियुगात भक्तीचे साधन श्रेष्ठ आहे. भक्तीने लवकर भगवंत प्रसन्न होतात. अन्य साधनांची भक्तीपुढे काही गरज भासत नाही, असेही ते म्हणाले.
पहिल्या दिवशी श्रीमद् भागवत महात्म्य सांगताना भक्तीपुत्र ज्ञान व वैराग्य व गोकर्ण कथा सांगितली. प्रथम स्कंदात व्यास व परीक्षित राजाची कथा सांगितली. द्वितीय स्कंदात शुकदेवाची कथा सांगून तृतीय स्कंदात मैत्रेय-विदुर संवाद आणि कर्दमाची गोष्ट सांगितली. दुसऱ्या दिवशी चतुर्थ स्कंदात दक्षयज्ञ, ध्रुव, वेना, पृथू, प्रचेत, पुरंजन यांची कथा तर पंचम स्कंदात प्रियव्रतवंश, ऋषभदेव व भरतराजाची कथा सांगितली. तिसऱ्या दिवशी षष्ठ स्कंदात भूगोल व भुवनेश वर्णन, अजामिळ कथा, दक्ष-प्रजापती, विश्वरूप, वृत्रासुराचे पूर्वचरीत्र व मरूद्गणाची उपपत्ती या कथा सांगितल्या. तर सप्तम स्कंदात प्रल्हाद चरित्र सांगितले.
भाविकांनी श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञासह कीर्तन श्रवणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक दिलीप मुऱ्हे, दत्तात्रय मुऱ्हे, किशोर मुऱ्हे, शरद मुऱ्हे यांनी केले आहे.



