भुसावळ (प्रतिनिधी ) – शहरातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांची तहान भागविण्यासाठी ममता फाउंडेशनतर्फे पाणपोईची सुविधा सुरू करण्यात आली आहे. कडक उन्हाळ्यात येणाऱ्या लोकांना पिण्याच्या पाण्याची तीव्र अडचण भासत होती. ही गरज ओळखून फाउंडेशनने संवेदनशीलतेने पुढाकार घेत स्वच्छ व थंड पाण्याची व्यवस्था उभारली आहे.

या उपक्रमासाठी नुतन फालक, हिरामण फालक व चंद्रकांत चौधरी यांनी विशेष प्रयत्न केले. उद्घाटन प्रसंगी नगरसेवक बबलू बऱ्हाटे व अजय पाटील उपस्थित होते. स्मशानभूमीसारख्या दुःखद ठिकाणीही माणुसकीचा स्पर्श देण्याचा हा प्रयत्न नागरिकांना मोठा दिलासा देणारा ठरत आहे.
भर उन्हात अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना थंड पाण्याचा आधार मिळावा, या उद्देशाने उभारलेली ही पाणपोई सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण ठरत आहे. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून “सेवेतूनच समाज घडतो” याची जाणीव फाउंडेशनच्या कार्यातून होत आहे.
ममता फाउंडेशनने यापूर्वी विठ्ठल मंदिर परिसरातही अशाच प्रकारचे उपक्रम राबविले असून, भविष्यातही समाजाभिमुख कार्य सुरू ठेवण्याचा मानस व्यक्त केला आहे. दुःखाच्या क्षणी दिलासा देणारी ही पाणपोई म्हणजे केवळ पाण्याची सोय नसून, माणुसकीचा ओलावा जपणारा एक प्रेरणादायी दीपस्तंभ आहे.


