चोपडा प्रतिनिधी):- शहरातील धरणगाव रोडवरील पाटचारीजवळ झालेल्या प्रदीप राजेंद्र महाजन माळी यांच्या निघृण खून प्रकरणाचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेला अवघ्या २४ तासांत यश आले आहे. मुंबईला पळून गेलेल्या दोन्ही आरोपींना नाशिक ते चाळीसगाव दरम्यान धावत्या रेल्वेतून अत्यंत शिताफीने ताब्यात घेण्यात आले. प्रदीप राजेंद्र महाजन (वय ३३ वर्षे, रा. तारामती नगर, चोपडा) यांचा दि. १९ एप्रिल रोजी रात्री ९ ते २० एप्रिल रोजी सकाळी ८:३० वाजेच्या सुमारास चेहरा आणि डोके अज्ञात हत्याराने ठेचून खून करण्यात आला होता. या प्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हा केल्यानंतर संशयित आरोपी विजय भास्कर वैदकर (रा. भाग्योदय नगर, चोपडा) आणि निर्मल संजय बडगुजर (रा. चिंच चौक, चोपडा) हे तात्काळ फरार झाले होते. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे ते मुंबईला गेल्याचे निष्पन्न झाले. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तात्काळ मुंबईकडे रवाना झाले. दरम्यान, आरोपी दादर येथून रेल्वेने पुन्हा जळगावकडे येत असल्याची माहिती मिळाली. पथकाने नाशिक रेल्वे स्थानकावरून जळगावकडे येणाऱ्या रेल्वेत बसून शोध सुरू केला आणि नाशिक ते चाळीसगाव दरम्यान धावत्या रेल्वेतून दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या.
संशयित आरोपींना चोपडा येथे आणून चौकशी केली असता, सुरुवातीला त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली नाही. मात्र, पोलिसांनी विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता, मयत प्रदीप महाजन याचे आरोपी विजय वैदकर याच्याशी जुने वाद (पूर्ववैमनस्य) असल्याने संगनमताने हा खून केल्याची कबुली त्यांनी दिली. संशयित आरोपी चेतन सुभाष कानडे याच्या सांगण्यावरून हे कृत्य केल्याचे समोर आले
सदर कारवाई पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक चाळीसगाव, उपविभागीय पोलीस अधिकारी चोपडा विभाग तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पथकात पोउनि सोपान गोरे, पोउनि जितेंद्र वल्टे, पोहेकॉ रवींद्र पाटील, दीपक माळी, विलेश सोनवणे, विष्णू बिन्हाडे, सुनील दामोदरे, पोकॉ रावसाहेब पाटील, चापोहेकॉ रिजवान शेख तसेच चोपडा शहर पोलीस ठाण्याचे पो. नि. पवन देसले, पोउनि चेतन परदेशी यांचा समावेश होता. अवघ्या २४ तासांत आरोपींना जेरबंद केल्याने पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.


