सीबीएसई परीक्षेसाठी मास्क लावणे आवश्यक, एका वर्गात १८ विद्यार्थ्यांना बसवण्यात येणार

भुसावळ : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे इयत्ता दहावी व बारावीच्या सीबीएसई परीक्षांना मंगळवारपासून सुरुवात होत आहे. कोरोनानंतर प्रथमच यंदा ऑफलाइन परीक्षा घेण्यात येणार आहे. दिल्लीतील वाढता संसर्ग पाहता सीबीएसई बोर्डातर्फे परीक्षेदरम्यान एका वर्गात १८ विद्यार्थ्यांचीच बैठक व्यवस्था करण्यात येणार अाहे. परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले आहे.

कोरोनानंतर प्रथमच ऑफलाइन बोर्डाच्या परीक्षा होणार असल्याने परीक्षा कशा घेण्यात याव्या, एका वर्गात किती विद्यार्थी असतील, शिक्षकांची नेमकी काय कामे राहतील याबाबत बोर्डातर्फे यंदा युट्युबच्या माध्यमातून शिक्षकांना मार्गदर्शन करण्यात आले.
सोमवारी सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम घेण्यात आला. २६ एप्रिल ते १५ जून दरम्यान इयत्ता बारावीची तर २६ एप्रिल ते २४ मे दरम्यान इयत्ता दहावीची परीक्षा होणार अाहे. विद्यार्थ्यांना शाळा तिथे केंद्र देण्यात आले आहे. परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना मास्क लावणे बंधनकारक आहे. पूर्वी एका वर्गात २४ विद्यार्थ्यांची व्यवस्था केली जात हाेती. मात्र आता एका वर्गात १८ विद्यार्थ्यांना बसवण्यात येणार अाहे. फिजिकल डिस्टन्सिंगचे काटेकाेर पालन करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने आवश्यक नियोजन केले आहे.
जेथे दहावी-बारावी तेथेच केंद्र
सीबीएसई अभ्यासक्रमाच्या ज्या शाळांमध्ये दहावी अाणि बारावीचे वर्ग अाहेत. त्याच शाळांमध्ये परीक्षा केंद्र देण्यात अाले अाहे. जळगाव शहरात रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूल, अाेरीयन सीबीएसई स्कूल, केंद्रीय विद्यालय, सेंट जाेसेफसह अन्य केंद्रात ही परीक्षा हाेणार अाहे. जेथे विद्यार्थी संख्या केवळ ४० ते ५० अाहे अशा शाळांचे केंद्र स्थलांतरीत करण्यात अाले अाहे.
{जगभरात चीनसह काही राष्ट्रे आणि भारतात दिल्लीत कोरोनाची रुग्ण संख्या वाढल्याने दहावी, बारावी सीबीएससी परीक्षांमध्ये कोविड प्रोटोकॉलचे पालन करण्यावर भर देण्यात आला आहे.
आजारी विद्यार्थ्यांची माहिती बाेर्डाला देणार, त्यांची पुनर्परीक्षा घेणार
बोर्डातर्फे ऑनलाइन परीक्षा सेंटर मॅनेजमेंट सिस्टम कार्यान्वित करण्यात आले आहे. आजारी विद्यार्थ्यांची माहिती बोर्डाला सादर करण्यात येणार अाहे. त्यांची पुनर्परीक्षा घेण्यात येईल. दरम्यान, सकाळी १०.३० ते दुपारी १२.३० या वेळेत परीक्षा होणार अाहे. सकाळी ९ वाजता विद्यार्थ्यांना केंद्रात प्रवेश दिला जाणार असल्याची माहीती जिल्हा समन्वयक सुषमा कंची यांनी दिली