भुसावळ – शहरातील पाणीपुरवठ्याच्या वेळेतच वीज भारनियमन वाढल्याने आठवड्याआड होणाऱ्या पाणीपुरवठ्यालाही नागरिक मुकले आहेत. यामुळे पाणीपुरवठा व वीज भारनियमन यांच्या वेळापत्रकाचा ताळमेळ बसवावा. पाणीपुरवठा होणाऱ्या काळात लोडशेडींग करु नये, अशी मागणी माजी नगरसेवक निर्मल कोठारी यांनी महावितरणकडे केली आहे. याबाबत त्यांनी कार्यकारी अभियंता प्रदीप घोरुडे यांची भेट घेवून ही मागणी केली.

शहरात महावितरणकडून लोडशेडींग सुरु आहे, राज्यात वीजेची मागणी वाढल्याने लोडशेडींगला विरोध नाही, मात्र यामुळे नागरिकांच्या तोंडचे पाणीही पळवले जात आहे. शहरातील पाणीपुरवठा योजना जिर्ण व कालबाह्य आहे. ४० वर्ष जुन्या या योजनेतून दिवसाला केवळ ४० ते ५० हजार नागरिकांना पुरवठा होऊ शकतो. तर शहराची लोकसंख्या अडीच लाखांवर आहे. सध्या श्रीरामनगर, सोनिच्छावाडी, गणेशपुरी, चमेली नगर, कोंडीवाडी अशा ठिकाणी सकाळी चार वाजेचा पाण्याचा वेळ आहे. मात्र याच दरम्यान वीजपुरवठा खंडीत होतो. याच प्रमाणे ५० टक्के भुसावळ शहरात हाच प्रश्न निर्माण झाला आहे. पाणीपुरवठ्याच्या काळात वीजपुरवठा खंडीत असला तर नागरिकांना पाणी भरता येत नाही. पाणी न मिळाल्यास पून्हा आठवड्याने पाणी मिळेल, अर्थात १६ दिवसांआड पाणीपुरवठा होईल. पालिका प्रशासन रोटेशन बदलू शकत नाही, यामुळे महावितरणने ताळमेळ साधून भारनियमाची वेळ निश्चित करावी, अशी मागणीही माजी नगरसेवक निर्मल कोठारी यांनी केली आहे.
संपूर्ण शहराला दिलासा मिळेल
सध्या तापमानात वाढ झाल्याने पाण्याची मागणी वाढली आहे. आमचा लोडशेडींगला विरोध नाही, मात्र यामुळे अर्ध्या भुसावळ शहराला त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे पाणी पुरवठ्याच्या वेळेच्या व्यतिरिक्त भारनियमन करण्यात यावे, संपूर्ण भुसावळ शहराला दिलासा द्यावा.
निर्मल कोठारी, माजी नगरसेवक, भुसावळ.


