सक्षम नारी फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम ; गरीब वस्तीमधील मुलांसाठी एक दिवसीय उन्हाळी शिबीर :


भिशी म्हणजे मैत्रिणीची भेट , खूप साऱ्या गप्पा , खाण्याची चंगळ आणि मजा … आणि या वेळच्या भिशीची तर केव्हापासूनच वाट पहात होतो कारण आमची प्रिय मैत्रीण शीतल ने काहीतरी आगळा वेगळा बेत केला होता .
वर्षामागुनी वर्षे जाती , बेट मनीचे तसेच राहती
नव्या वर्षी नव्या भेटी , नवीन उपक्रम घेऊ हाती
असा संकल्प करून पारंपरिक भिशी न करता सगळ्यांनी एकत्र जमून गरीब वस्तीमधील मुलांसाठी एक दिवसीय उन्हाळी शिबीर घेण्याचे शितल यांनी ठरविलं .
त्यानुसार दिनांक १६ एप्रिल २०२२ रोजी दुपारी दोन वाजता रमाबाई आंबेडकर नगरमधील बुद्ध विहारात आम्ही सारे जमलो . आज काहीतरी नवीन करायला मिळणार ह्या विचारांनी बच्चे कम्पनी तयारीतच आली .
यावेळी दीप प्रज्वलन करून तजेच वंदना कांबळे यांनी वंदना घेऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली . सक्षम ग्रुप मधील सखींनी सक्षम आणि अखण्ड रहाण्याची शपथ घेतली . माणसाने माणसाशी माणसासम वागणे ही प्रार्थना सर्वानी म्हटली . शैला ताई आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सुंदर अशी मनाला निर्मळ आणि तेजस्वी करणारी प्रार्थना घेतली . तसेच छान छान गाण्यांमधून मुलांना पाढेही शिकवले . हस्तकलेच्या पाठात मुलांना विविध प्रकारच्या कागदाच्या टोप्या , पिशव्या तसेच माळा बनवण्यास शिकवले . मधे मधे मनोरंजनासाठी गाणी आणि जादूचे प्रयोग सुद्धा होते. सुनीता जोशी आणि शीतल मोरे यांनी छोटेसे नाटुकले सादर करून मुलांना वाहतुकीचे नियम शिकवले .
यावेळी डॉ दीप्ती यांनी मुलांची तपासणी करून त्यांना उष्माघाताचा त्रास होऊ नये म्हणून होमिओपॅथीच्या गोळ्या वाटल्या . उमेश दादांनी मुलांना गुड टच आणि बॅड तच याची माहिती देणारी एक सुंदर व्हिडीओ क्लिप दाखवली . तसेच स्वच्छ हात धुण्याचे महत्व , शरीराची स्वछता आणि ती कशी घ्यावी याची मनोरंजक पद्धतीने माहिती दिली .तर डॉ सुवर्णा आणि सुयश यांनी मुलांना चित्रकलेची पुस्तकं आणि रंगीत खडू वाटले . डॉ वैशाली रामवंशी आणि प्रिशा यांनी पाण्याच्या बॉटलचे वितरण केले . कार्यक्रमाचा समारोप शीतल ताईंनी आणलेला स्वादिष्ट अल्पोपहार देऊन करण्यात आला . संगीता जगताप , गायत्री विसपुते , शीतल भालेराव , सुजाता सपकाळे यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी मदत केली . मुलाच्या चेहऱ्यावरचा आनंद कार्यक्रम यशस्वी झाला याची पावती देत होता . एक आगळी वेगळी भिशी केल्याचे समाधान सक्षम नारी फाउंडेशनच्या संख्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते . शीतलताई मोरेंच्या ह्या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करावे तेव्हढे कमीच आहे . त्यांनी स्वतःपासुन सुरुवात करून सर्व सख्यांना भिशी बरोबरच असा सामाजिक उपक्रम सुद्धा राबवून कित्येक चेहऱ्यावर हसू फुलवू शकतो असा संदेशही दिल्याच्या प्रतिक्रिया डॉ सुवर्णा गाडेकर यांनी व्यक्त केल्या .