भुसावळात शौर्या अकॅडमीतर्फे विजय दौड उत्साहात संपन्न :

भुसावळ : शौर्या अकॅडमीतर्फे गुरुवार, 16 डिसेंबर या दिवशी विजय दौड आयोजित करण्यात आली. अकॅडमीचे प्रवीण नायसे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. 16 डिसेंबर 1971 रोजी भारताने पाकिस्तानवर भव्य विजय मिळविला. येथील शौर्या अकॅडमीतर्फे 50 किलोमीटर दौड सैनिकांप्रती असणार्‍या सन्मान आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी व बलिदान आठविण्यासाठी आयोजित करण्यात आली.
मोंढाळा येथून या दौडला पहाटे पाच वाजता सुरुवात झाली. मोंढाळ्याचे प्रदीप परदेशी व तरुणांनी या दौडचे नेतृत्व केले. ही दौड शिंदी, विचवा, भानखेडा, गोळेगाव, पिंपळगाव खुर्द, सुसरी, वरणगाव, फुलगाव, जाडगाव, साकर, किन्ही, शिवपूर, भुसावळ, चोरवडमार्गे, कुर्‍हेपानाचे येथे शहीद राकेश शिंदे यांच्या समाधीजवळ समारोप करण्यात आला. यावेळी शहीद राकेश शिंदे यांचा परीवार उपस्थित होता. वेगवेगळ्या गावातील सुमारे 350 युवक या दौडमध्ये सहभागी झाले. विविध ठिकाणी प्रा.कौस्तुभ पाटील यांनी 1971 युध्दाची माहिती सांगीतली. तसेच शहीद राकेश शिंदे यांचे बंधू सुरेश शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले.