वरणगाव – ओझरखेडा धरणात तातडीने पाणी टाकावे, संबंधित निष्काळजी व बेजबाबदार अधिकार्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी व शेतकर्यांच्या झालेल्या पिकांच्या नुकसानीची भरपाई वसूल करावी, या मागणीसाठी आमदार चंद्रकांत पाटील यांनी जलसंपदामंत्री जयंत पाटील व जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले मात्र मागण्या मान्य न झाल्याने मंगळवार पासून तयांनी जलसमाधी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर प्रत्यक्षात आंदोलन सुरू केल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान, मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत बाहेर निघणार नाही असा पवित्रा आमदार चंद्रकांत पाटील यांनी घेतला आहे.

धरण कोरडेठाक : पिके सापडली संकटात
सुमारे दिड महिन्यांपूर्वी वरणगाव – तळवेल उपसा सिंचन योजनेंतर्गत असलेल्या ओझरखेडा धरण पाणलोट क्षेत्रातील शेतकर्यांचे केळी व इतर पिके संकटात आल्याने शेतकर्यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडे धाव घेतली होती. त्यानुसार एक महिन्यांपूर्वी आमदार चंद्रकांत पाटील यांनी पाठपुरावा केल्याने पालकमंत्री गुलाबराव पाटील , जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत राऊत व पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांची आढावा बैठक झाली. यात ओझरखेडा धरणात तातडीने पाणी सोडण्यासाठी चर्चा होत पालकमंत्र्यांनी नियमित देखभाल दुरुस्ती व पंप दुरुस्तीसाठी तात्काळ कार्यकारी संचालक यांचेशी चर्चा करून निधी उपलब्ध करून दिला होता परंतु जलसंपदा विभागाच्या अधिकारी यांनी आजतागायत गांभीर्य न दाखवले नाही. हतनूर धरणातून मोठ्या प्रमाणावर पाणी वाया गेले तर याच पाण्याने ओझरखेडा धरणात फुल्ल भरते असते मात्र निव्वळ हलगर्जीपणा संबंधित अधिकार्यांनी केला. यामुळे सदरील धरण कोरडेठाक होण्याच्या मार्गावर असून या पाणलोट क्षेत्रातील हजारो हेक्टर शेत जमिनीतील केळीसह इतर पिके संकटात सापडली आहे.


