भुसावळ (प्रतिनिधी )-
शहरातील नूतन प्राथमिक शिक्षक पतपेढीत नियमबाह्यपणे भरती करण्यात आल्याची तक्रार पतसंस्थेच्या तिघा संचालकांनी जिल्हा उपनिबंधकांकडे केली असून या प्रकाराची चौकशीची मागणीही करण्यात आली आहे. तक्रारीचा आशय असा की, भुसावळ येथील नूतन प्राथमिक शिक्षक पतपेढी येथील लिपीक पवन पाटील यांचा कोरोनाने 24 एप्रिलला मृत्यू झाल्यानंतर सदर लिपिकाची जागा अंध-अपंग अनुशेष अंतर्गत भरण्यात आली होती मात्र लिपिकाच्या मृत्यूला एक महिनाही उलटत नाही तसेच मयत लिपिकाचा मृत्यु दाखला नसताना व कर्ज खाते बंद न करता तोच अवघ्या एक महिन्यात वरीष्ठ कार्यालयाची परवानगी न घेता अनुशेषानुसार भरती प्रक्रिया न राबवता पद भरण्यात आल्याचा आरोप संचालक प्रदीप सोनवणे, निलेश पाटील व कैलास तायडे यांनी जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे तक्रारीद्वारे केला आहे.
संस्थेच्या आर्थिक हितास बाधा आणणारी भरती
संचालकांनी केलेल्या तक्रारीचा आशय असा की, पतपेढीचा सी.डी.रेशो प्रमाण 70 ते 60 टक्के असणे गरजेचे असतांना 105 टक्क्यांवर गेला आहे. ही बाब पोटनियमबाह्य असल्याचा शेरा वैधानिक लेखा परीक्षकांनी दिला आहे. 2019-20 चे लेखापरीक्षणानुसार या पतपेढीतील सभासद संख्या, गंगाजळी, व स्वनिधीमध्ये घट आलेली आहे. वैधानिक लेखापरीक्षक अहवालानुसार महाराष्ट्र सहकारी कायदा नियम 54 व 55 कलम 70 अन्वये राखीव निधी व इतर निधी गुंतवणूक केलेली नसल्यामुळे संस्थेच्या आर्थिक हितास बाधा आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
नियमानुसार भरती : निवडणुका डोळ्यापुढे ठेवून आरोप -सभापती
मंजूर रीक्त पदांवर नियमानुसार भरती करण्यात आली आहे. निवडणुका जवळ आल्याने संचालकांची ही स्टंटबाजी करण्याचा प्रकार सुरू आहे. संबंधित आरोप करणारे पतसंस्थेत पदाधिकारी राहून चुकले असून त्यांच्याकडूॅन दिशाभूल करण्याचा हा प्रकार असून पतपेढीला नाहम बदनाम करण्याचा त्यांचा हेत असल्याचे सभापती ज्योती साठे म्हणाल्या.



