भुसावळात शिक्षण संस्थांकडून जिल्हाधिकारी यांचे आदेशाचे उल्लंघन; पूर्ण क्षमतेने २०० शिक्षक शाळा, महाविद्यालयात हजर


भुसावळ (प्रतिनिधी )-
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने ‘ब्रेक द चेन’ साठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ५ एप्रिल २०२१ च्या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालय, कोचिंग क्लासेस बंद ठेवण्याच्या सूचना होत्या. मात्र ६ एप्रिल पासूनच भुसावळात शिक्षण संस्थांनी पूर्ण क्षमतेने शिक्षक, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत शाळा, महाविद्यालय सुरू ठेवल्याचा प्रकार निदर्शनास आला. भुसावळातील काही शाळेत दोन तास तर इतर महाविद्यालयात पूर्णवेळ प्राध्यापक, शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. उर्वरित जळगाव जिल्हयातील उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय तसेच फार्मसी व अभियांत्रिकी महाविद्यालय बंद होती याउलट जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेशाला केराची टोपली भुसावळातील शिक्षण संस्थांकडून दाखवली गेली. भुसावळातील स्थानिक शिक्षकांनी व संघटनांनी शिक्षक सेनेचे जिल्हाप्रमुख प्राचार्य विनोद गायकवाड यांच्याकडे समस्या मांडल्या. त्यानूसार जिल्हाप्रमुख प्राचार्य विनोद गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा संघटक घनश्याम निळे, जिल्हा सचिव बाळू गायकवाड यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात लेखी तक्रार दाखल केली आहे. ४५ वर्षाखालील सर्वच शिक्षकांना कोरोना लसीकरण करावे असेही निवेदनात म्हटले आहे.
अनेक प्राध्यापक कोरोना बाधित:
भुसावळात अनेक शिक्षक इतर तालुक्यातुन प्रवास करून येतात. मागील महिन्यात महाविद्यालयीन प्राध्यापकांचा, शिक्षकांचा व त्यांच्या परिवारातील सदस्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझीटीव्ह आल्याचे आरोग्य विभागाच्या माहितीत उघड झाले होते. शिक्षण संस्थेच्या माध्यमातून कोरोनाचा फैलाव होत आहे अश्या अनेक तक्रारी आरोग्य विभागात प्राप्त झाल्या, उपाययोजना कराव्यात अश्या सूचना आरोग्य विभागाने प्राचार्यांना दिल्या, तरी सुद्धा शासनाचे आदेश झुगारून विद्यार्थी नसले तरी भुसावळात शाळा, महाविद्यालयात २००-२०० कर्मचारी रोज कार्य करीत आहेत. अशात कोरोना कसा आटोक्यात येणार? हा प्रश्न उपस्थित होतो.
जिल्हा प्रशासनाची कारवाई?
भुसावळात कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. कोरोनाबाधित शिक्षकांची संख्या जास्त आहे. कोरोनामुळे दगवलेल्या शिक्षकांच्या परिवाराला विशेष पॅकेज शासनाने जाहीर केले पाहिजे. शिक्षक व त्यांच्या परिवाराच्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय गंभीर बाब समोर आल्याने स्थानिक प्रशासनाने लक्ष घालणे महत्वाचे होते. परंतु स्थानिक पातळीवर कारवाई होत नसल्याने थेट जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी कारवाई करण्याची अपेक्षा प्राचार्य विनोद गायकवाड यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *