भुसावळ (प्रतिनिधी )-
शहरात पाच कोटींच्या रस्ता कामांना मंजुरी मिळाल्यानंतर तीन कोटींच्या कामांना प्रत्यक्षात सुरूवात झाली होती मात्र कारपेट लेव्हल करण्यापूर्वी ठेकेदाराने काम बंद केल्याने वाहनधारकांसह शहरवासीयांमधून नाराजीचा सूर उमटत होता. या संदर्भात माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकार्यांशी चर्चा करून अडचणी दूर केल्या. शुक्रवारी दुपारी खडसे यांनी नगराध्यक्ष, कंत्राटदार व मुख्याधिकार्यांची बैठक घेत शहरातील नव्याने केलेल्या रस्ता कामांची पाहणी केली. निकृष्ट काम खपवून घेतले जाणार नाही शिवाय आता कामात खंड पडता कामा नये, अशा सूचना त्यांनी कंत्राटदाराला केल्या.
शुक्रवारी कंत्राटदाराने ज्या-ज्या भागात रस्त्यांची कामे केली त्या भागात स्वतः माजी खडसे यांनी जावून कामांची पाहणी केली तसेच दर्जादेखील तपासला. पाच कोटींच्या कामांना मंजुरी व वर्क ऑर्डरही मिळाल्याने आता विना खंड कामे पूर्ण करण्याची सूचना त्यांनी कंत्राटदार विनय बढे यांना केली तसेच रस्त्यांचे काम दर्जेदार पद्धत्तीने करण्याच्या सूचना केल्या. खडसेंच्या तंबीनंतर लोणारी समाज मंगल कार्यालयाजवळ रस्त्यावर कारपेट टाकण्याच्या कामाला सुरूवात झाल्याने वाहनधारकांनी समाधान व्यक्त केले. नगराध्यक्ष रमण भोळे व मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांनादेखील त्यांनी कामांचा दर्जा राहण्यासाठी सजग राहण्याचे निर्देश दिले. दर आठ दिवसात शहरातील रस्त्यांची पाहणी करणार असल्याचे खडसे यावेळी म्हणाले. प्रसंगी नगराध्यक्ष रमण भोळे, मुख्याधिकारी संदीप चिद्रवार, नगरसेवक प्रा.सुनील नेवे, प्रमोद नेमाडे, अॅड.बोधराज चौधरी, वसंत पाटील, राजू सूर्यवंशी, दिनेश नेमाडे, सुमित बर्हाटे आदींची उपस्थिती होती,



