भुसावळातील आमदार सावकारेंचा मोबाईल चोरांनी पळवला ; अप विदर्भ एक्स्प्रेसमधील घटना : यंत्रणा लागली कामाला : अवघ्या तासात सापडला मोबाईल ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
रेल्वेत दररोज होणार्‍या चोर्‍या नवीन नाहीत मात्र चोरट्याने चक्क विदर्भ एक्स्प्रेसमधून प्रवास करणार्‍या भुसावळचे आमदार संजय सावकारे यांच्या हातातील मोबाईल लांबवून रेल्वे सुरक्षा बलासह लोहमार्ग पोलिसांच्या अस्तित्वालाच आव्हान दिले. आमदारांचा मोबाईल चोरीला गेल्याची वार्ता सुरक्षा यंत्रणांना कळताच यंत्रणा कामाला लागली व अवघ्या काही तासात मोबाईलचा तपास लावण्यात यंत्रणेला यश आले मात्र चोरटे पसार होण्यात यशस्वी झाले. या प्रकरणी चाळीसगाव लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सोमवारी रात्री अप 02105 विदर्भ-गोंदिया एक्स्प्रेसच्या एसी एक वनच्या बर्थ क्रमांक 39 वरून आमदार संजय सावकारे प्रवास करीत असताना एका युवकाने मोबाईल चेक करायचा असल्याचे सांगत आमदारांच्या हातातील 90 हजार रुपये किंमतीचा मोबाईल हिसकावला व आऊटरवर पळ काढला. आमदार आरोपीच्या मागे धावले मात्र तो पर्यंत तो सार झाला. आमदारांनी या प्रकरणी चाळीसगाव लोहमार्ग पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यावरून मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. आमदारांनी अंगरक्षकासह अन्य जणांना मोबाईल चोरीची माहिती दिल्यानंतर भुसावळात सुरक्षा यंत्रणा कामाला लागली.
बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या डीबी पथकातील पोलिस व आमदारांचे काही पदाधिकार्‍यांनी रात्रीच रेल्वे मार्गावर तपास सुरू केला असता स्वामी समर्थ केद्राजवळ एका तृतीय पंथीयाकडे आमदारांचा मोबाईल सापडला. पोलिसांनी मोबाईल ताब्यात घेत चौकशी केली असता तृतीय पंथीयाने कुणीतरी युवकाने हा मोबाईल दिल्याचे सांंगितले.
आमदार संजय सावकारे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, मुंबईहून परतल्यानंतर वरीष्ठ अधिकार्‍यांच्या उपस्थितीत शहरातील तीनही पोलिस ठाण्यांसह लोहमार्ग पोलिस अधिकार्‍यांच्या उपस्थितीत बैठक घेतली जाईल. शहरातील वाढत्या गुन्हेगारीला जनता व प्रवासी कंटाळले असून यावर आळा घालणे गरजेचे आहे.
रेल्वेत सातत्याने वाढत असलेल्या चोर्‍यांमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आमदारांचा मोबाईल चोरी झाल्याने सर्वसामान्यांचे काय? असा प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *