भुसावळ (प्रतिनिधी )-
युवा क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यांच्या नेहरू युवा केंद्र व पेयजल स्वच्छता मंत्रालय, भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘स्वच्छ भारत समर इंटर्नशिप’ कार्यक्रमात स्वच्छता क्षेत्रात भरीव कार्य करणार्या युवकांना जिल्हा राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर सन्मानीत करण्याचा उद्देश होता. यात संपूर्ण राज्यातील युवकांनी सहभाग घेतला होता. 2018 व 2020 मध्ये भुसावळ शहरात स्वच्छ भारत अभियानात भुसावळ नगरपरिषदेत स्वच्छतादूत (ब्रँड अॅम्बेसेडर) असणारे रणजीतसिंग राजपूत ह्यांनी त्यांच्या संस्कृती फाउंडेशन संस्थेच्या वतीने भुसावळ शहरात स्वच्छता क्षेत्रात भरीव कार्य केले. भिंती रंगवून स्वच्छतेसंदर्भात प्रबोधन, पथनाट्ये करून लोकांमध्ये जनजागृती, घरोघरी जाऊन स्वच्छतेचे महत्व समजावून, नदीकाठी स्वच्छता मोहीम राबवून प्रत्येक शाळा महाविद्यालयात प्रबोधन केले ह्याच सर्व केलेल्या कार्यची दखल घेत युवा क्रीडा मंत्रालय भारत सरकार ह्यांच्या नेहरू युवा केंद्र जळगांव ह्यांच्या वतीने स्वच्छ भारत अभियान अंतर्गत महाराष्ट्र राज्यात तृतीय क्रमांक तर जळगांव जिल्ह्यात प्रथम क्रमांक त्यांना मिळाला.यावेळी जिल्हा युवा कार्यक्रम सल्लागार समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत राऊत यांच्या हस्ते रणजीतसिंग राजपूत यांना पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, नेहरू युवा केंद्र जळगांव जिल्हा समन्वयक नरेंद्र डागर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरवीरसिंग रावळ, जिल्हा महिला व बाल कल्याण अधिकारी विजयसिंग पवार, जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षीत, जिल्हा कौशल्य विकास विभागाचे अनिसा तडवी इत्यादी मान्यवरांची उपस्थिती होती. युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय यांच्या नेहरू युवा केंद्र संलग्न संस्था संस्कृती फाउंडेशनच्या वतीने दीपक पाटील, तेजस गांधेले, आयुष सोढाई उपस्थित होते. माझ्यासारख्या युवकांने संस्कृती फाउंडेशन युवकांच्या संस्थेच्या माध्यमातून केलेल्या कार्याची दखल घेत स्वच्छता क्षेत्रात राज्यात तृतीय तर जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळाला यामुळे आनंद होत आहे ह्याचे यश संपूर्ण युवकांना जाते. जे माझ्यासोबत संस्थेत कार्य करीत आहेत, असे पुरस्कार्थी तथा संस्कृती फाउंडेशन अध्यक्ष रणजीतसिंग राजपूत म्हणाले.



