बोरखेडा येथे शेत रखवालदाराच्या चारही अल्पवयीन मुलांची तीक्ष्ण हत्याराने वार करून हत्या ;

     
रावेर (प्रतिनिधी) –
शहराच्या पुर्वेला बाेरखेडा रस्त्यावरील एका शेतात रहिवासी असलेल्या शेत रखवालदाराच्या चारही अल्पवयीन मुलांची तीक्ष्ण हत्याराने वार करून हत्या करण्यात आल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. या घटने मुळे  शहर व परीसरात एकच खळबळ उडाली आहे. 
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार रावेर – बाेरखेडा रस्त्यावर शेख मुस्तफा यांची शेती आहे. या ठिकाणी शेतात रखवालदार असलेला महेताब गुलाब भिलाला हा पत्नी व पाच मुलांसह वास्तव्यास आहे. गुरूवारी महेताब हा पत्नी व थाेरल्या मुलासह मध्यप्रदेशातील मुळगावी गढी (ता. बिस्टान, जि. खरगाेन) येथे 
नातेवाईकाचे दशक्रिया विधीसाठी  माेटारसायकलने गेला हाेता. दोन मुली व दोन मुले हे घरीच होते. रात्री घरात गाढ झाेपलेल्या कु. सविता (वय १४), राहूल (वय ११), अनिल (वय ८), व नाणी (वय ५) या चाैघाही मुलामुलींची अज्ञात मारेकऱ्याने कुऱ्हाडीने घाव घालून हत्या केली. शुक्रवारी सकाळी  शेतमालक शेख मुस्तफा हे शेतात गेल्यावर सदर प्रकार त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी पाेलिसांना कळविले. घटनेचे वृत्त समजताच  उपविभागीय पोलीस अधिकारी नरेंद्र पिंगळे, पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे, सहा. पोलीस निरीक्षक शितलकुमार नाईक व सहका-यांनी घटनास्थळी धाव घेतली.     
दरम्यान घटनास्थळी पाेलिस अधिक्षक डाॅ. प्रविण मुंढे व अप्पर पाेलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी दाखल झाले आहेत. आमदार चंद्रकांत पाटील यांनी ही घटनास्थळी भेट दिली. पाेलिस अधिक्षक यांनी सांगितले की, या संदर्भात ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल हाेवून समिती गठीत करून तपास केला जाणार आहे. पाेलिस विभागातर्फे संबंधीत कुटूंबाला सर्वाेताेपरी मदत करण्यात येणार असल्याचे ही ते म्हणाले. दरम्यान  घटनास्थळी जळगाव येथुन श्वान पथक व ठसे तज्ञ यांना पाचारण करण्यात आले आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *