भुसावळ प्रतिनिधी –

काशी एक्सप्रेसमधून प्रवास करणार्या प्रवाशाचा मोबाईल अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना घडल्यानंतर लोहमार्ग पोलिसांनी विधीसंघर्ष बालकाकडून हस्तगत करुन न्यायालयाच्या आदेेशाने फिर्यादिस परत देण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, ऋषीकेश वसंता पांडव (रा. हेडगेगवार चौक, रावेर) हे ४ मार्च रोजी गाडी क्र १५०१८ अप काशी एक्सप्रेसने रावेर ते जळगाव असा जनरल डब्यातून प्रवास करित असतांना अज्ञात चोरट्याने त्यांची नजर चुकवून त्यांचा ९ हजार रुपयांचा मोबाईल लांबविला होता. याबाबत लोहमार्ग पोलिसात गु.र.नं. २४६/२०, भा.दं.वि. ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात अला होता. त्यानुसार चोरट्याचा शोध सुरु असताना पो.नि. दिनकर डंबाळे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे एएसआय मधुकार न्हावकर यांनी विधी संघर्षीत बालकाकडून १४ रोजी मोबाईल हस्तगत केला. व न्यायालयाच्या आदेशाने दि. १७ रोजी फिर्यादी ऋषिकेश पांडव यांना परत देण्यात आला.
चोरलेला मोबाईल तक्रारदाराला परत
अप ११०५८ पठाणकोट एक्स्प्रेसने भुसावळ ते जळगाव प्रवास करीत असलेल्या निलेश जगन्नाथ वाणी (संतोषी डेअरीजवळ, जळगाव) आऊटरजवळ गाडी आली असता आरोपी राहुल देविदास तायडे (२४, शेगाव, जि.बुलढाणा) याने हाताला काठी मारत ५८ हजार रुपये किंमतीचा मोबाईल लांबवला होता.आरोपीला अटक केल्यानंतर त्याच्या ताब्यातून मोबाईल जप्त केल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार तो तक्रारदार वाणी यांना नुकताच परत करण्यात आला.
मोबाईल चोरट्याला अटक
अहमदाबाद-यशवंतपूरच्या एक्स्प्रेसच्या कोच क्र. चारमधील बर्थ क्र. ५६ वरून नंदुरबार ते जळगाव प्रवास करीत असलेल्या अतुल रामदास बठेजा (आदर्श नगर, सिंधी कॉलनी, भुसावळ) हे जळगाव येथे उतरत असताना चोरट्यांनी ३० हजार रुपयांचा मोबाईल लांबवला होता. १४ सप्टेंबर रोजी ही घटना घडली होती. या प्रकरणी विनोद मोरेश्वर ईडी (४७, खालचे गाव, ब्रह्मटेक, बालाजी मंदिरामागे, शिरपूर, जि.धुळे) या आरोपीलस अटक करण्यात आली असून त्याच्या ताब्यातून मोबाईल जप्त करण्यात आला. ही कारवाई पो.नि. दिनकर डंबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय नितीन न्हावकर, हवालदार नितीन पाटील, भरत शिरसाठ आदींनी केली.


