भुसावळातील दोघा तरुण मित्र भाविकांचा तापी नदीत बुडाल्याने मृत्यू


भुसावळ (प्रतिनिधी )
-येथील शनी मंदिर वॉर्डातील युवक गणेश विसर्जनासाठी तापी नदी पात्रात गेले असता पाण्याच्‍या खोलीचा अंदाज न आल्याने दोघा तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना काल दि.१ सप्‍टेंबद मंगळवार रोजी सायंकाळी पावणेसात वाजेच्या सुमारास घडली होती. शनी मंदिर वॉर्डातील उपेंद्र गुलाब चौधरी (वय १९) व वैभव संजय शिंदे (वय १९) व शनिमंदिर वाॅर्ड गणेश मंडळातील सुमारे १५ भाविक काल सायंकाळी गणेश विसर्जनासाठी रेल्‍वेच्‍या झेडटीसी. भागातील स्मशानभूमी समोरील रेल्वे पुलाखाली गेले होते. यावेळी पाण्याच्‍या खोलीचा त्‍यांना अंदाज न आल्याने चौघे बुडाले.यातील धिरज संजय शिंदे (वय २१) व किरण विश्वास मराठे (वय २६) या दोघांना वाचविण्यात बचाव दलाला यश आले व तात्‍काळ दोघांना भुसावळातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले तर वैभव संजय शिंदे व उपेंद्र गुलाब चौधरी हे दोघंही तरूण बेपत्ता झाले होते. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत दोघांचाही शोध न लागल्याने बुधवारी सकाळपासून पुन्हा शोध सुरू करण्यात आला असता प्रथम उपेंद्र चौधरीचा व नंतर वैभव शिंदेचा मृतदेह सापडला. घटनास्थळी भुसावळ कृउबाचे सभापती सचिन चौधरी,माजी उपनगराध्‍यक्ष अनिल चौधरी, नगरसेवक संतोष(दाढी)चौधरी,कैलास चौधरी यांच्‍यासह प्रभागातील नागरिक तसेच भुसावळ तालुका पोलिस ठाण्‍याचे अधिकारी व कर्मचारी हजर होते.या प्रकरणी भुसावळ तालुका पोलिस ठाण्‍यात अकस्‍मात मृत्‍यूची नोंद करण्‍यात आली होती.अत्‍यंत शोकाकूल वातावरणात सायंकाळी या दोन्‍ही मित्रांवर अंत्‍यसंस्‍कार करण्‍यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *