भुसावळ (प्रतिनिधी )-
शहरातील खडकारोड परीसरातील डॉक्टर दाम्पत्याकडे झालेल्या चोरी प्रकरणी अटकेतील दोघा आरोपींकडून १५ हजारांचे दागिने तसेच पाच हजारांची रोकड जप्त करण्यात आली. खडका रोड परीसरातील एक डॉक्टरांना कोरोना झाल्याने त्यांच्या कुटुंबालाही क्वॉरंटाईन केल्याने घर बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी धाडसी घरफोडी केली होती.
या गुन्ह्यात सुरुवातीला एलसीबीने दोन आरोपींना अटक केली होती तर अन्य दोन आरोपी जाम मोहल्ला परीसरात आल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस पथक जाम मोहल्ला परीसरात आल्यानंतर शेख जहीर शेख सलीम (रा.मुस्लीम कॉलनी, भुसावळ) व शेख अल्तमश शेख रसीद (रा.जाम मोहल्ला, भुसावळ) यांना अटक करण्यात आली तर आरोपींनी पोलिसांशी झटापट केल्याने एकाच्या कंबरेला लागलेले पिस्टल (गावठी कट्टा) खाली पडून त्यातून गोळी सुटली मात्र सुदैवाने ती कुणालाही लागली नव्हती तर आरोपींना अटक केल्यानंतर न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली होती तर चौकशीदरम्यान आरोपींनी खडकारोडला एका रस्त्याच्या बाजूला खड्डा खोदून लपवलेले १५ हजारांचे दागिने व पाच हजारांची रोकड काढून दिली. दरम्यान, चोरीतील अन्य मुद्देमाल कोठे आहे, याची चौकशी पोलिांकडून सुरू आहे. तपास पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलिस निरीक्षक अनिल मोरे व पोलिस कर्मचारी पुढील तपास करीत आहे.



