जिल्ह्यात आठ हजार बेडची व्यवस्था, कोरोनाच्या प्रतिकारासाठी जिल्हा प्रशासन सज्ज ; गुलाबराव पाटील ; गावांतर्गत विकास कामासाठी दोन कोटींचा निधी मंजूर

जळगाव (प्रतिनिधी )-
जिल्ह्यात कोरोनाने हातपाय पसरविण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यात “कोरोना’बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असल्याने जिल्ह्यात आपत्कालीन स्थिती उद्‌भवल्यास जिल्ह्यात आठ हजार बेडची व्यवस्था करण्यात आली असून, “कोरोना’च्या प्रतिकारासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याची माहिती पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. जिल्ह्यातील “कोरोना’बाधितांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर आणि कापूस लागवडीसंदर्भात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आढावा बैठक घेतली.
याप्रसंगी मंत्री पाटील म्हणाले, की संशयितांचे अहवाल लवकरात लवकर उपलब्ध व्हावे, यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. “कोरोना’ तपासणी केंद्राचे काम ८० टक्के पूर्ण झाले असून, त्या संबंधित मशिनरी येताच संशयित कोरोनाग्रस्तांचे स्वॅब तपासणीची प्रयोगशाळा कार्यान्वित होईल. जिल्ह्यात संशयित “कोरोना’च्या रुग्णांसाठी व्हेंटिलेटरची आवश्‍यकता असल्याने जिल्ह्यातील दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन रुग्णांसाठी व्हेंटिलेटरची व्यवस्था करण्यास मदत करावी, असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे. तसेच कापूस लागवडीबाबत कृषी मंत्री दादा भुसे यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे चर्चा केली असून, एक मेस जिल्ह्याचा खरीप आढावा घेण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.दरम्यान, अमळनेर, भुसावळ, चाळीसगाव तालुक्‍यालाही कोरोनाचा संसर्गाचा धोका संभवतो. यामुळे या तीनही तालुक्‍यांच्या सीमा अत्यावश्‍यक सेवा वगळून इतरांसाठी बंद झाल्या पाहिजे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. यावेळी जिल्हा रुग्णालयाचे शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. बी. एस. खैरे, जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पाटोदे कृषी विभागाचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, कृषी उपसंचालक अनिल भोकरे, जिल्हा परिषदेचे जिल्हा कृषी अधिकारी वैभव शिंदे बैठकीस उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *