भुसावळ-बडनेरा-नरखेड मेमू गाडीतील सुविधांमध्ये वाढ करावी- समाधान महाजन

भुसावळ (प्रतिनिधी )-
प्रवश्यांच्या सुविधेकरीता रेल्वे प्रशासनाने नुकतीच सुरु केलेल्या भुसावळ-बडनेरा-नरखेड मेमू गाडीतील सुविधांमध्ये वाढ करावी अशी मागणी शिवसेना तालुका प्रमुख समाधान महाजन यांनी भुसावळ तालुका शिवसेनेच्या वतीने केली असून याबाबत रेल्वे मंत्रालय व रेल्वे प्रशासनाला पत्र पाठविले आहे.
मध्य रेल्वे प्रशासनाने मोठ्या थाटात दोनदा शुभारंभ करून १ फेब्रुवारी पासून भुसावळ – बडनेरा ही मेमू गाडी सुरु केली. प्रवाशांच्या अधिक सोयीची
नरखेड ही पॅसेंजर बंद करुन रेल्वेने सुरु केलेल्या या मेमूमुळे सुविधा कमी व गैरसोयीच अधिक वाढल्या आहेत. दररोज सकाळी ६.३० वाजता भुसावळ स्थानकातून बडनेऱ्याकडे सुटणारी मेमू वरणगाव स्थानकावरच गर्दीने फुल्ल होते. बोदवड, मलकापूर व नांदूरा स्थानकावर तर गाडीत पाय ठेवण्यासाठी देखील जागा मिळत नाही. या गाडीतील प्राथमिक सोयीसुविधांची अवस्था पाहिली की ‘मोठे घर, पोकळ वासा’याची जाणीव होते. रेल्वे प्रवाशांना अत्याधुनिक सोयीसुविधांची स्वप्ने दाखवताना प्राथमिक सोयीसुविधा पुरवण्याचे भानही रेल्वे प्रशासनाला नाही.
सामान्य प्रवाशांनाच नेहमी असुविधा
वरणगाव, आचेगाव, बोदवड, कोल्हाडी, खामखेड, मलकापूर, वडोदा, बिस्वाबिज, खुमगाव, नांदूरा, जलंब, शेगाव स्थानकावर आधीच्या पॅसेंजरमध्ये जागा मिळत होती परंतु आता बसण्यासाठी काय उभं राहण्यासाठी सुद्धा जागा मिळत नाही. सामान्य, महिला व जेष्ठ नागरिकांना असुविधाचा जास्त त्रास सहन करावा लागत आहे. गाडी वेळेवर चालण्याव्यतिरिक्त सुविधांमध्ये कोणतीही वाढ मेमूमुळे झाली नाही. या उलट गैरसोयीच अधिक झाल्या. प्रवाशांना सामान ठेवण्यासाठी पुरेशी जागा नसणे, आसनक्षमता कमी असल्याने उभे राहून प्रवास करण्याव्यतिरिक्त प्रवाशांना दुसरा पर्याय नाही अश्या असंख्य तक्रारी भुसावळ तालुक्यातील प्रवाशांनी तालुका शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडे केल्या आहेत.
डब्यांची संख्या १५ पर्यंत वाढवावी
पूर्वीच्या अमरावती- नरखेड पॅसेंजर गाडीच्या तुलनेत सहा डबे मेमू गाडीला कमी आहेत. रेल्वे प्रशासनाने या गाडीच्या डब्यांच्या संख्येत १५ पर्यंत वाढ करावी अशी मागणी रेल्वे प्रवाशी तसेच भुसावळ तालुका शिवसेनेच्या वतीने रेल्वे मंत्रालय व रेल्वे प्रशासनाकडे करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *