भुसावळ (प्रतिनिधी )- मोदी सरकारने देशात सीसीए कायदा लागू करुन देशाचे मुळच तोडण्याचा घाट घातला आहे.हा कायदा जाती आणि धर्माच्या आधारावर असुन, संविधान विरोधी आहे. देशात सत्तेच्या पदांवर गोडसेवादी आहेत, तर गांधीवादी शाहीनबाग मध्ये लढा देत असल्याचे सांगत ही लढाई आता गांधी आणि गोडसे यांची लढाई असल्याची टीका राजकीय विचारवंत योगेंद्र यादव यांनी केली. ते दि. ८ रोजी दुपारी येथील भारतीय संविधान बचाव नागरी कृती समितीच्या वतीने खडका रोड भागातील जी.एन.जी पार्क ग्राउंडवर आयोजित जाहीर सभेत
प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी माजी आ. संतोष चौधरी होते. प्रसंगी लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे, गफ्फार मलिक, मराठा क्रांती मोर्चाचे विनोद देशमुख, संविधान जागर समितीचे मुकुंद सपकाळे, शेतकरी संघटनेचे सचिन धांडे, जळगावचे माजी उपमहापौर करिम सालार मंचावर उपस्थित होते.
यावेळी एनआरसी विरोधात यादव म्हणाले की, सरकार या कायद्याद्वारे देशात फुट पाडत आहे. मात्र आता हे आंदोलन केवळ कायद्याविरुद्ध नव्हे तर भारत जोडो आंदोलन आहे. शाह- शहंशाह यांनी देश तोडण्याचा कितीही प्रयत्न केला तरी आम्ही मात्र देश जोडू हा संकल्प केला आहे . प्रत्येक जण हातात तिरंगा आणि संविधानाची प्रत,मनात अहिंसा घेऊन आंदोलनात सहभागी होऊन सत्याची लढाई शांततेच्या मार्गाने जिंकणार असा ठाम विश्वास यादव यांनी व्यक्त केला .
आपल्या पंतप्रधानांना हे दिसत नाही, या आंदोलनामुळे सर्व भारतीय म्हणून एकत्र आले आहेत. देशात आपले आणि परके हा फरक दाखविण्यासाठी सरकारने सीसीए हा काळा कायदा आणला. ज्यांच्याजवळ स्वत:ची डिग्री नाही तेच रहिवासाचे पुरावे मागत आहे .
मात्र या देशात ज्यांच्या बापजाद्यांची राख आणि हाडं पुरली आहे, हा देश त्यांचाच असल्याचे ते म्हणाले. आज जरी एनआरसी लागू केला नसला तरी चार महिन्या नंतर तो लागू करण्यात येणारच आहे . मोदी सरकारने स्पष्टपणे कायदा रद्द करावा आम्ही आंदोलन मागे घेवू अन्यथा आंदोलना द्वारे ही लढाई सुरु राहिल असा खणखणीत इशारा सुद्धा यादव यांनी दिला.
आज देशभरात मोठे आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन आता दुसर्या टप्प्यात आले आहे. सीएए आणि एनआरसी यांना विरोध केला जात आहे. सीएए कायद्यात शरणार्थी, अल्पसंख्याक, पीडित, शेजारी हे चार शब्दांचा उल्लेख नाही. मात्र, भाजपा ते उघडपणे सांगायला तयार नाही. इथेच खरी गुंतागुंत आहे. शरणार्थींना कधीही धर्म, जात न विचारणारा हा भारत देश आहे. हा मुद्दा स्वामी विवेकानंद यांनी यापूर्वीच सांगितला आहे. हेच पंतप्रधानांनी सांगणे गरजेचे आहे. शरणार्थींना धर्म, जात विचारणार नाही असे पंतप्रधानांनी जाहीर करावे. असा कायदा भाजप आणत असेल तर आम्ही या कायद्याचे स्वागत करू असेही यावेळी राजकिय विचारवंत योगेंद्र यादव यांनी सांगितले .
तिरंगा, संविधान व देशाच्या स्वातंत्र्यावर बोलने हा गुन्हा आहे काय? महाराष्ट्र कधी उत्तर प्रदेश झाला? असा प्रतिप्रश्न यादव यांनी केंद्र सरकार व स्थानिक पोलिस प्रशानाला विचारला. तसेच उमर खलीद यांना का घाबरतात. त्यांची सभा भिवंडी (मुंबई) येथे झाली. त्या ठिकाणी ते संत तुकाराम यांच्यावर बोलले. तेथे अशी कोणतीच घटना घडली नाही. पंतप्रधान म्हणतात की, मी कपड्यांवरून माणसे ओळखतो. पण पंतप्रधानांना फक्त टोपी दिसते. तिरंगा दिसत नाही. मोदी यांच्याऐवजी जर कोणी दुसरा पंतप्रधान राहिला असता त्याला तिरंगा पाहून, भारत मातेच्या जयघोषाच्या घोषणा ऐकून गर्व झाला असता. मात्र, मोदींना त्याचा गर्व वाटत नाही.
फूट पाडणे हा सीएए व एनआरसीचा उद्देश
सीएए कायद्यात मुस्लिम देशातील गैरमुस्लिम लोकांना शरण देण्यात येणार आहे. त्यात नवीन बाब काय? सीएए कायदा म्हणजे जिलेबीसारखा आहे. भारतातील नागरिकांमध्ये फूट पाडणे, हा या कायद्याचा उद्देश आहे, अशी तिव्र टीका यादव यांनी केंद्र सरकारवर केली.
ते म्हणाले की मोदीजी खोटं खूप चांगलं बोलतात. एनपीआरसाठी जेव्हा कोणी तुमच्या घरी येईल तेव्हाच त्याला विरोध करा, अन्यथा पुढे जाऊन संकट वाढेल. देशभर सीएए कायद्याला विरोध सुरू आहे. आता सर्वांनी मिळून त्याला विरोध करण्याची गरज आहे.
लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे यांनी, आम्ही स्वतंत्र्य लढ्यात रक्त सांडलेल्यांचे वारसदार आहोत. शहरातील सभेला प्रशासनाने परवानगी नाकारली होती.मात्र आपण, परवानगी द्या अथवा नको द्या सभा होणारच असे पोलिस अधिक्षकांसमोर ठणकावून सांगितले होते. पोलीस प्रशासन व सरकार ला ठणकावून सांगितले की आम्हाला बंद करणारी जेल अद्याप तयार झालेली नाही. कारण ‘एक पाव रेल में और एक पाव जेल मेंं’ असा आमचा नारा असल्याने आम्ही परिणामांना घाबरत नसल्याचा ईशारा त्यांनी दिला. आता देशात दुसर्या स्वातंत्र्याची लढाई लढण्याची वेळ आली आहे. स्वातंत्र्यानंतर गोरे इंग्रज निघुन गेले मात्र आता काळ्या इंग्रजां सोबत आपला लढायचे आहे. यावेळी त्यांची उमर खलिद यांच्या संभाषणाची ऑडिओ सभोत ऐकविली. त्यात खलीद यांनी मी आज जरी नाही आलो तरी नंतर येईलच. पोलिसांनी मला येण्यास परवानगी नाकारली आहे. तरी आपण लढाई सुरु ठेवावी असे आवाहन केले.देशातून स्वातंत्र्य लढ्याचा आवाज सर्वच भागातून निघत आहे. कायदा बदलत नाही तो पर्यंत माघार घेऊ नका असे आवाहन खालीद यांनी ऑडिओ मधून केले.
अध्यक्षिय भाषणात माजी आ. संतोष चौधरी यांनी, धर्माच्या विरुद्ध असलेल्यांविरुद्ध हे आंदोलन आहे. सरकारला हा कायदा आणण्याची गरज नव्हती. डॉ. बाबासाहेबांच्या घटनेला हात घालण्याचा प्रयत्न सरकारने केला.अन्याय कदापी सहन करणार नाही .
यावेळी गफ्फार मलिक, करिम सलार, मकुंद सपकाळे आदींनी मनोगत व्यक्त केले.सभेसाठी कॉंग्रेसचे संजय ब्राह्मणे, रवींद्र निकम, गटनेता उल्हास पगारे, भारिपचे विनोद सोनवणे आदी उपस्थित होते.
योगेंद्र यादव यांचे क्रांतिकारी विचार ऐकन्यासाठी हजारोंच्या संख्यने मुस्लिम बांधवांसह महिलांचीही उपस्थिती मोठ्या संख्यने होती .प्रसंगी यादव यांनी हात उंचावून वज्रमुठ करीत उपस्थितांना लडेंगे -जितेंगे, वो तोड़ेंगे -हम जोडेंगे असा संकल्प करीत इन्कलाब जिंदाबाद अश्या घोषणा दिल्या. सभा यशस्वितेकरिता संविधान बचाव नागरी कृती समितीचे सलीम चूडिवाले , मुन्नवर खान, साबीर शेख , दानेश पटेल, फारूक नजीर, इमरान खान , आबिद भाई , फुरकान , अशरफ कुरेशी , फरहान यांनी परिश्रम घेतले . दरम्यान, या सभेसाठी केवळ योगेंद्र यादव यांनाच परवानगी देण्यात आली होती. मात्र कायदा व सुव्यवस्था राखण्यात यावी यासाठी संविधान बचाव नागरी कृती समितीच्या दहा सदस्यांना पोलिस प्रशासनातर्फे नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. तर या सभे दरम्यान अनुचित प्रकार घडू नये म्हणून डिवायएसपी गजानन राठोड, पोलिस निरीक्षक दिलीप भागवत, पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, पोलिस निरीक्षक रामकृष्ठ कुंभार यांच्या एक असे चार पोलिस निरीक्षक, १६ दुय्यम अधिकारी, दोन एसआरपी प्लाटून, चार पुरुष व एक महिला आरसीपी प्लाटून, दोन स्ट्रायकिंग फोर्स, १६५ पोलिस कर्मचारी (३१ महिला) असा तगडा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता.



