पोलीस भरती इच्छुक युवक-युवतींसाठी भुसावळात विशेष मार्गदर्शन सत्र! २९ ऑक्टोबरला रेल्वे ग्राउंडवर आयोजन; अर्ज प्रक्रिया, लेखी परीक्षा आणि शारीरिक चाचणीबाबत मिळणार मार्गदर्शन भुसावळ (प्रतिनिधी) : आगामी महाराष्ट्र पोलीस भरतीच्या अनुषंगाने पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या युवक-युवतींना योग्य मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने भुसावळ येथे विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक, जळगाव यांच्या विशेष पुढाकाराने गुरुवार, दि. २९ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी ४ वाजता रेल्वे ग्राउंड, भुसावळ येथे हे विनामूल्य सत्र पार पडणार आहे. या मार्गदर्शन सत्रात भुसावळ उपविभागातील पोलीस भरतीसाठी इच्छुक असलेल्या युवक-युवतींना भरती प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती देण्यात येणार आहे. पोलीस भरतीसाठी अर्ज कसा करावा, अर्जासोबत कोणती आवश्यक कागदपत्रे सादर करावीत, लेखी परीक्षेची तयारी कशी करावी आणि शारीरिक चाचणीसाठी कोणत्या बाबींवर लक्ष केंद्रित करावे, याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून शंकांचे निरसन पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवारांना येणाऱ्या अडचणी आणि शंकांचे निरसन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. भरती प्रक्रियेतील विविध टप्पे समजून घेण्यासोबतच योग्य नियोजन आणि तयारीसाठी हे सत्र उपयुक्त ठरणार आहे. इच्छुक उमेदवारांना उपस्थित राहण्याचे आवाहन भुसावळ व परिसरातील पोलीस भरतीसाठी इच्छुक असलेल्या सर्व युवक-युवतींनी गुरुवार, २९ ऑक्टोबर रोजी दुपारी ३.४५ वाजेपर्यंत रेल्वे ग्राउंड, भुसावळ येथे उपस्थित राहावे आणि या विनामूल्य मार्गदर्शन सत्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन पोलीस उपअधीक्षक, भुसावळ उपविभाग यांच्यातर्फे करण्यात आले आहे. पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी ही संधी महत्त्वपूर्ण ठरणार असून, योग्य मार्गदर्शनाच्या माध्यमातून भरती प्रक्रियेची तयारी अधिक प्रभावीपणे करता येणार आहे.


