भुसावळ (प्रतिनिधी)-मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात दिनांक २२ ऑक्टोबर २०२६ रोजी विभागातील ७० रेल्वे स्थानकांवर ‘रेल जन संवाद’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. भारतीय रेल्वेच्या देशव्यापी उपक्रमाचा हा एक महत्त्वाचा भाग असून, प्रलंबित बाबींचे निराकरण करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विशेष मोहिमेअंतर्गत प्रवाशांशी थेट संवाद साधणे, त्यांच्या समस्या व सूचना जाणून घेणे आणि रेल्वे सेवांमध्ये सातत्याने सुधारणा करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. भारत सरकारच्या निर्देशानुसार, दिनांक २ ते ३१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत सर्व क्षेत्रीय रेल्वे आणि रेल्वे युनिट्समध्ये ‘स्वच्छता विशेष मोहीम ६’ (SCDPM-6) राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत स्वच्छता, कार्यालयीन व सार्वजनिक जागांचे प्रभावी व्यवस्थापन, भंगार आणि ई-कचऱ्याची योग्य विल्हेवाट, तसेच नागरिकांचा सक्रिय सहभाग यांसारख्या बाबींवर विशेष भर दिला जात आहे. या व्यापक मोहिमेचा एक भाग म्हणून देशभरातील ७,००० हून अधिक रेल्वे स्थानकांवर ‘रेल जन संवाद’ उपक्रम आयोजित करण्यात येत आहे. या उपक्रमानंतर संबंधित स्थानकांवर स्वच्छता मोहीमही राबविण्यात येत आहे. भुसावळ विभागातील ७० स्थानकांवर आयोजित या कार्यक्रमाद्वारे प्रवाशांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या प्रवासादरम्यान येणाऱ्या अडचणी, स्थानकांवरील उपलब्ध सुविधा, स्वच्छता, प्रवासी सोयी-सुविधा आणि रेल्वे सेवांबाबतच्या सूचना जाणून घेण्यात आल्या. प्रवाशांच्या अनुभवांना आणि अपेक्षांना महत्त्व देत रेल्वे प्रशासन अधिक उत्तरदायी, पारदर्शक आणि नागरिक-केंद्रित बनविण्याचा या उपक्रमाचा प्रयत्न आहे. या उपक्रमाची संकल्पना “जन की आवाज, युवा की सोच, रेल का समाधान” अशी असून, यामध्ये विशेषतः तरुणांचा सहभाग वाढविण्यावर भर देण्यात आला आहे. तरुण प्रवाशांना त्यांचे विचार, सूचना आणि नाविन्यपूर्ण उपाय मांडण्यासाठी प्रोत्साहित करून रेल्वे सेवांमध्ये सुधारणा करण्यासाठी लोकसहभागातून व्यावहारिक उपाय शोधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. - भुसावळ रेल्वे स्थानकावर आयोजित कार्यक्रमाचे नेतृत्व विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्री पुनीत अग्रवाल यांनी केले. यावेळी वरिष्ठ विभागीय अधिकारी उपस्थित होते. त्यांनी प्रवाशांशी संवाद साधून त्यांच्या सूचना, अडचणी आणि अपेक्षा जाणून घेतल्या. तसेच प्रवाशी, शालेय विद्यार्थी सहभागी होते. - जळगांव रेल्वे स्थानकावर आयोजित कार्यक्रमास खासदार माननीय श्रीमती स्मिता उदय वाघ यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच श्री सतीश सिंह चौहान, मुख्य कारखाना व्यवस्थापक, इलेक्ट्रिक लोको शेड, भुसावळ; श्री दिलीप खरात, वरिष्ठ मंडल कार्मिक अधिकारी, भुसावळ आणि अन्य अधिकारी स्थानक व्यवस्थापक कर्मचारी उपस्थित होते. - नाशिक रोड रेल्वे स्थानकावर आयोजित कार्यक्रमास मुख्य वाणिज्य व्यवस्थापक (प्रवासी सेवा) मध्य रेल्वे डॉ. आरती सिंह परिहार, सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक (तिकीट तपासणी) श्री पी के सिंह, वरिष्ठ मंडल अभियंता श्री मनीष, स्थानक प्रबंधक, मुख्य आरोग्य निरीक्षक, मुख्य वाणिज्य निरीक्षक, कर्मचारी उपस्थित होते. - अमरावती रेल्वे स्थानकावर आयोजित कार्यक्रमास अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक (तांत्रिक) श्री एम के मीना आणि अन्य अधिकारी स्थानक व्यवस्थापक, कर्मचारी उपस्थित होते. प्रवाशांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारी, सूचना आणि अभिप्राय यांचे पद्धतशीर संकलन करून त्यांचे तीन श्रेणींमध्ये वर्गीकरण करण्यात येणार आहे. - अल्पकालीन बाबी: ज्या समस्या तातडीने किंवा कमी कालावधीत सोडविता येतील, त्यांचे प्राधान्याने निराकरण करण्यात येईल. - मध्यमकालीन बाबी: ज्या समस्यांसाठी संबंधित विभागांमध्ये समन्वय, नियोजन आणि आवश्यक कार्यवाहीची गरज आहे, त्यानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल. - दीर्घकालीन बाबी: ज्या विषयांमध्ये धोरणात्मक निर्णय, विस्तृत नियोजन, आर्थिक तरतूद किंवा उच्चस्तरीय मंजुरी आवश्यक आहे, अशा बाबी सक्षम प्राधिकरणांच्या विचारार्थ सादर करण्यात येतील. या प्रक्रियेमुळे प्रवाशांनी मांडलेल्या समस्यांचा योग्य पाठपुरावा करणे, त्यांचे निराकरण करण्यासाठी निश्चित कार्यपद्धती विकसित करणे आणि संबंधित विभागांमध्ये समन्वय साधणे शक्य होणार आहे. ‘रेल जन संवाद’ हा केवळ प्रवाशांच्या तक्रारी व सूचना ऐकण्यापुरता मर्यादित उपक्रम नसून, रेल्वे प्रशासन आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक दृढ करणारा महत्त्वपूर्ण प्रयत्न आहे. प्रवाशांच्या सहभागातून रेल्वे स्थानकांवरील सुविधा, स्वच्छता आणि एकूण प्रवासाचा अनुभव अधिक चांगला करण्यासाठी या उपक्रमाचा उपयोग होणार आहे. मध्य रेल्वेचा भुसावळ विभाग प्रवाशांना सुरक्षित, स्वच्छ, सुविधाजनक आणि अधिक दर्जेदार सेवा उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध असून, प्रवाशांच्या सूचना व अभिप्रायांच्या आधारे रेल्वे सेवांमध्ये सातत्याने सुधारणा करण्यासाठी प्रयत्नशील आहे.



