भुसावळ तालुक्यात २० ग्रामपंचायतींमध्ये महिला सरपंच पदासाठी आरक्षण निश्चित ;सर्वसाधारण प्रवर्गातून गोजोरा ग्रामपंचायतीची चिठ्ठीद्वारे निवड; ओझरखेडा व वराडसिममध्ये मागास प्रवर्गातील महिला सरपंच

भुसावळ (प्रतिनिधी) : भुसावळ तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतींमध्ये सन २०११ च्या जनगणनेनुसार नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी ५० टक्के आरक्षणाची मर्यादा विचारात घेऊन सरपंच पदासाठी महिला आरक्षणाची सोडत प्रक्रिया मंगळवारी, दि. ८ सप्टेंबर २०२६ रोजी भुसावळ उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी व्यासपीठावर तहसीलदार निता लबडे उपस्थित होत्या.

नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी चार ग्रामपंचायती निश्चित करण्यात आल्या असून, तळवेल, वराडसिम, मन्यारखेडे आणि ओझरखेडा या ग्रामपंचायतींचा त्यात समावेश आहे. यापैकी वराडसिम आणि ओझरखेडा या दोन ग्रामपंचायती नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिला सरपंच पदासाठी थेट आरक्षित झाल्या आहेत.

सर्वसाधारण प्रवर्गासाठी एकूण २० ग्रामपंचायती आरक्षित करण्यात आल्या. यामध्ये काहुरखेडा-मानपूर, पिंप्रीसेकम-निंभोरा बु., सुसरी, जोगलखेडा-भानखेडा, सुनसगाव-गोंभी, गोजोरा, मोंढाळे, पिंपळगाव बु., साकेगाव, मांडवेदिगर-भिलमळी, अंजनसोंडे, कन्हाळे खु., बोहर्डी बु.-बोहर्डी खु., बेलव्हाळ, जाडगाव, कठोरे बु., कठोरे खु., शिंदी, वेल्हाळे आणि कंडारी या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

यापैकी पिंपळगाव बु., अंजनसोंडे, कन्हाळे खु., बोहर्डी बु.-बोहर्डी खु., बेलव्हाळ, कठोरे बु., कठोरे खु., शिंदी आणि वेल्हाळे या नऊ ग्रामपंचायती सर्वसाधारण महिला सरपंच पदासाठी थेट आरक्षित करण्यात आल्या.

उर्वरित एका जागेसाठी २०२०-२०२५ या कालावधीत महिला आरक्षण असलेल्या ११ ग्रामपंचायतींमधून चिठ्ठीद्वारे निवड करण्यात आली. यावेळी अज्ञान बालक गार्गी अनिल भोई (वय ६ वर्षे) हिच्या हस्ते चिठ्ठी काढण्यात आली. त्यामध्ये गोजोरा ग्रामपंचायतीची सन २०२५-२०३० या कालावधीसाठी सर्वसाधारण महिला सरपंच पदाकरिता निवड झाली.

त्यामुळे सन २०२५-२०३० या कालावधीसाठी सर्वसाधारण प्रवर्गातील महिला सरपंच पदाकरिता पिंपळगाव बु., अंजनसोंडे, कन्हाळे खु., बोहर्डी बु.-बोहर्डी खु., बेलव्हाळ, कठोरे बु., कठोरे खु., शिंदी, वेल्हाळे आणि गोजोरा या दहा ग्रामपंचायती आरक्षित झाल्या आहेत.

 नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आणि सर्वसाधारण महिला या दोन्ही प्रवर्गांतील सरपंच पदाचे आरक्षण निश्चित झाले असून, भुसावळ तालुक्यातील महिला सरपंच पदाची आरक्षण प्रक्रिया पूर्ण झाली.