भुसावळ (प्रतिनिधी) : जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यात अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याच्या संशयावरून खासगी शिकवणी घेणाऱ्या व्यक्तीविरोधात संतप्त जमाव आक्रमक झाला. या घटनेमुळे बोदवड परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. संशयित व्यक्तीचे मूळ गाव असलेल्या ठिकाणी संतप्त जमावाने धाव घेत वाहनांची जाळपोळ व तोडफोड केली. तसेच अनेक वाहनांवर दगडफेक करण्यात आली. या घटनेत तीन दुचाकी जळाल्याची, तर तीन कारची तोडफोड झाल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच जिल्ह्यातील विविध ठिकाणांहून अतिरिक्त पोलिसांची कुमक बोदवडमध्ये दाखल करण्यात आली. जमावाची आक्रमक भूमिका लक्षात घेऊन पोलिसांनी संशयित व्यक्तीसह त्याच्या कुटुंबातील नऊ सदस्यांना सुरक्षितस्थळी हलवले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांकडून जमावाला पांगवण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर करण्यात आल्याची माहिती आहे. बोदवड पोलिस ठाण्यात अल्पवयीन पीडितेचा जबाब नोंदवण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. दरम्यान, जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. बोदवड तसेच संशयिताच्या मूळ गावात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू असून, सध्या बोदवडमध्ये तणावपूर्ण शांतता आहे.



