मुंबई -दि. २९ (प्रतिनिधी) : पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत महिला पत्रकारांना संघटनात्मक बळ, सुरक्षितता, सन्मान आणि सक्षम व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने व्हॉईस ऑफ मीडिया, महिला विंग महाराष्ट्र राज्याची प्रदेश कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. नारीशक्तीला संघटित करून पत्रकारितेतील महिलांच्या प्रश्नांना बुलंद आवाज देण्याचा निर्धार या नव्या कार्यकारिणीच्या माध्यमातून करण्यात आला असून, प्रदेशाध्यक्ष म्हणून वैशाली पाटील यांची निवड करण्यात आली आहे. तसेच रोशनी बैस आणि सारिका शिंदे यांच्यावर विभागीय प्रदेशाध्यक्षपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली आहे. राज्याच्या सर्व विंग च्या प्रमुख असणाऱ्या रश्मी मारवाडी यांनी ही निवड केली. सविता चंद्रे यांनी या निवडीला अनुमोदन दिले आहे. व्हॉईस ऑफ मीडियाचे संस्थापक तथा आंतराष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, भारत देशाचे अध्यक्ष अनिल म्हस्के,महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष विजय चोरडिया यांनी सर्व पदाधिकारी यांना शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्रातील विविध विभागांत कार्यरत महिला पत्रकारांना एका सक्षम संघटनात्मक छत्राखाली आणून त्यांच्या हक्कांसाठी, सुरक्षिततेसाठी, सन्मानासाठी आणि व्यावसायिक प्रगतीसाठी प्रभावीपणे काम करण्याचे धोरण महिला विंगने निश्चित केले आहे. महिला पत्रकारांचे प्रश्न शासन आणि प्रशासनापर्यंत प्रभावीपणे पोहोचवणे, पत्रकार महिलांसाठी विविध कल्याणकारी उपक्रम राबविणे, आरोग्य व सुरक्षिततेसाठी विशेष प्रयत्न करणे, नवोदित महिला पत्रकारांना मार्गदर्शन व प्रशिक्षण देणे, डिजिटल पत्रकारितेतील बदलत्या संधी उपलब्ध करून देणे तसेच महिलांच्या नेतृत्वगुणांना चालना देणे, ही महिला विंगची प्रमुख उद्दिष्टे राहणार आहेत. राज्य महिला विंगच्या नव्या कार्यकारिणीत प्रदेशाध्यक्ष (सुप्रीम) म्हणून वैशाली पाटील यांची नियुक्ती करण्यात आली असून विभागीय प्रदेशाध्यक्ष म्हणून रोशनी बैस आणि सारिका शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. कार्याध्यक्ष म्हणून लक्ष्मी वाढेकर,उपाध्यक्ष म्हणून शुभांगी करने तर महासचिव म्हणून रेणुका कोटम्बकर, सहसचिव म्हणून ज्योती सरपाते, तर खजिनदार म्हणून पल्लवी शेटे,यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे. कार्यवाह म्हणून वैशाली चवरे, उषा नाईक आणि मुक्ता आरडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रवक्तेपदाची जबाबदारी रंजना जळगावकर यांच्याकडे देण्यात आली असून जनसंपर्क प्रमुख म्हणून अहिल्या कसपटे यांची निवड करण्यात आली आहे. राज्य संघटक म्हणून सोनाली सगर, विजया बारसे आणि धनश्री खडके यांची नियुक्ती करण्यात आली असून संघटक म्हणून स्वाती खुणे आणि सुनीता सकाळीकर यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. सदस्य म्हणून दिशा पाटील , अनुराधा आहेर आणि सोनिया साठे, रुकसार शेख यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील विभागनिहाय संघटनात्मक विस्तार अधिक प्रभावी करण्यासाठी पाचही विभागांमध्ये महिला नेतृत्वाची मजबूत फळी उभारण्यात आली आहे. विदर्भ विभागासाठी कविता नागापुरे, कोकण विभागासाठी समिधा खपाळे,मराठवाडा विभागासाठी दर्शना बोऱ्हाडे पाटील, उत्तर महाराष्ट्रासाठी उज्वला बागुल आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी ऋतुजा कदम यांची महिला प्रदेश विभागीय प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. महिला पत्रकारांना केवळ संघटनेचे सदस्यत्व देणे हा महिला विंगचा उद्देश नसून त्यांच्या अधिकारांचे संरक्षण, सामाजिक प्रतिष्ठा, पत्रकारितेतील सुरक्षित वातावरण, आर्थिक व व्यावसायिक सक्षमीकरण आणि नेतृत्वाची नवी पिढी घडविणे, या व्यापक उद्देशाने महिला विंग कार्य करणार आहे. गावपातळीपासून राज्यपातळीपर्यंत महिला पत्रकारांचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले जाणार आहेत. यावेळी व्हॉईस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल मस्के यांनी सांगितले की, “नारीशक्तीला संघटनाचे बळ मिळाले, तर परिवर्तनाची दिशा बदलू शकते. महिला पत्रकारांच्या कर्तृत्वाला योग्य व्यासपीठ, सुरक्षित वातावरण आणि सन्मान मिळवून देण्यासाठी व्हॉईस ऑफ मीडिया महिला विंग प्रभावीपणे काम करेल. महाराष्ट्रातील प्रत्येक महिला पत्रकाराचा आवाज संघटनेचा आवाज बनेल, हा आमचा निर्धार आहे.” महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष विजय चोरडिया म्हणाले की, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पत्रकारितेची मशाल घेऊन कार्यरत असलेल्या महिलांना एकत्र आणत “स्वाभिमान, सुरक्षितता, सन्मान आणि संघटन” या चतु:सूत्रीवर महिला विंगची वाटचाल होणार आहे. नव्या कार्यकारिणीच्या घोषणेनंतर महिला पत्रकारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, “नारीशक्तीचा आवाज आता अधिक बुलंद होणार!” असा विश्वास व्यक्त केला जात आहे. महिला पत्रकारांच्या संघटनात्मक सक्षमीकरणाच्या दिशेने व्हॉईस ऑफ मीडियाने टाकलेले हे महत्त्वपूर्ण पाऊल महाराष्ट्रातील पत्रकारिता क्षेत्रासाठी एका नव्या पर्वाची सुरुवात ठरणार आहे. नव निर्वाचित महिला प्रदेशाध्यक्ष वैशाली पाटील म्हणाल्या की, “व्हॉईस ऑफ मीडिया महिला विंगच्या माध्यमातून महाराष्ट्रातील प्रत्येक महिला पत्रकाराला संघटनाचे बळ देण्याचा आमचा प्रयत्न राहील. महिला पत्रकारांच्या सुरक्षिततेपासून त्यांच्या हक्कांपर्यंत, व्यावसायिक प्रगतीपासून नेतृत्व विकासापर्यंत प्रत्येक स्तरावर प्रभावीपणे काम केले जाईल. राज्यातील गावागावांत आणि जिल्ह्या-जिल्ह्यांत महिला पत्रकारांचे मजबूत संघटन उभे करून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी महिला विंग सातत्याने कार्यरत राहील. सर्व सहकारी पदाधिकारी आणि महिला पत्रकारांना सोबत घेऊन एक सक्षम, सशक्त आणि प्रभावी महिला पत्रकार संघटना उभारण्याचा आमचा निर्धार आहे.”


