जळगाव–भुसावळ–वरणगाव पट्ट्यात अपघातांची भीती; निष्पाप जनावरांसह वाहनधारकांच्या जीवितास धोका ; NH-53 वर मोकाट गोधनाचा वाढता धोका; पशुपालकांनी जनावरे रस्त्यावर सोडू नयेत, अन्यथा कारवाईचा इशारा ;

भुसावळ प्रतिनिधी : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ (NH-53) वरील जळगाव–भुसावळ–वरणगाव या अत्यंत वर्दळीच्या मार्गावर सध्या मोकाट सोडण्यात येणाऱ्या गोधनाची तसेच इतर जनावरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. महामार्गाच्या मध्यभागी अथवा रस्त्याच्या कडेला ही निष्पाप जनावरे उभी राहत असल्यामुळे वाहनचालकांसमोर अचानक धोका निर्माण होत असून, भीषण अपघातांची शक्यता वाढली आहे.

विशेषतः रात्रीच्या वेळी अथवा भरधाव वाहतुकीदरम्यान रस्त्यावर अचानक जनावरे आल्याने वाहनचालकांना ब्रेक लावणे किंवा वाहनावर नियंत्रण ठेवणे कठीण होते. यामुळे अनेकदा गंभीर अपघात घडत असून, निष्पाप गोमाता व इतर जनावरे गंभीर जखमी होऊन तडफडत मृत्युमुखी पडत आहेत. दुसरीकडे, दुचाकीस्वार, चारचाकी वाहनचालक आणि प्रवाशांच्या जीवितालाही मोठा धोका निर्माण झाला आहे.

या पार्श्वभूमीवर संबंधित पशुपालकांना जाहीर आवाहन करण्यात आले आहे की, ज्या कोणाच्या मालकीची ही जनावरे आहेत, त्यांनी ती राष्ट्रीय महामार्गावर मोकाट सोडू नयेत. आपल्या जनावरांची योग्य देखभाल करून त्यांना सुरक्षित ठिकाणी, गोठ्यात किंवा बांधून ठेवावे.

“ही जनावरे तुमची जबाबदारी आहे, समाजाची नाही,” असा स्पष्ट संदेश देत पशुपालकांनी आपल्या निष्काळजीपणामुळे इतरांच्या जीवाला धोका पोहोचणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक असल्याचेही आवाहन करण्यात आले आहे.
नगरपालिका प्रशासनाने त्वरित  दखल घ्यावी...
भुसावळ आणि वरणगाव नगरपालिका प्रशासनाने या बाबीकडे गांभीर्याने आणि लवकरात लवकर लक्ष घ्यावे. हायवेवरील मोकाट जनावरांना हटवून त्यांची कोंडवाड्यात किंवा गोशाळेत रवानगी करण्यासाठी त्वरीत गोशाळा वा कोंडवाडा आदी उपाय योजना कराव्यात अशी मागणी जोर धरत आहे. 

या आवाहनानंतरही कोणाची जनावरे राष्ट्रीय महामार्गावर मोकाट फिरताना अथवा आढळून आल्यास संबंधित मालकांवर नियमांनुसार दंडात्मक व फौजदारी स्वरूपाची कायदेशीर कारवाई करण्यात येऊ शकते. तसेच मोकाट जनावरांमुळे एखादा अपघात घडल्यास किंवा जीवित व मालमत्तेचे नुकसान झाल्यास संबंधित मालकाविरुद्ध कायदेशीर गुन्हा दाखल होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

राष्ट्रीय महामार्ग हा सर्वसामान्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी आहे. त्यामुळे पशुपालकांनी जबाबदारीचे भान ठेवून आपली जनावरे रस्त्यावर सोडणे तातडीने बंद करावे, अशी मागणी नागरिक व वाहनधारकांकडून होत आहे. मोकाट जनावरांचे संरक्षण आणि प्रवाशांची सुरक्षितता या दोन्ही गोष्टींसाठी पशुपालकांनी पुढाकार घेणे ही काळाची गरज बनली आहे. अशीही मागणी गोसेवकांसह गोप्रेमी व जनतेने केली आहे.