भुसावळ, प्रतिनिधी - पैगंबर-ए-इस्लाम हजरत मोहम्मद मुस्तफा यांच्या पवित्र जन्मदिनानिमित्त ईद मिलादुन्नबीच्या पार्श्वभूमीवर दावते इस्लामी हिंदच्या सामाजिक विभाग GNRF (गरीब नवाज रिलीफ फाउंडेशन) तर्फे देशभर विविध सामाजिक व सेवाभावी उपक्रम राबविण्यात येत आहेत. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून भुसावळ GNRF टीमच्या वतीने गोदावरी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांना फळे व खाद्यपदार्थांचे पॅकेट वितरित करण्यात आले. या उपक्रमातून रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत मानवता, सहानुभूती आणि सेवाभावाचा संदेश पोहोचविण्यात आला. यावेळी दावते इस्लामी जळगाव जिल्हाध्यक्ष जुबेर अत्तारी यांनी सांगितले की, संस्थेच्या वतीने देशातील विविध भागांमध्ये रुग्णालये, अनाथालये आणि कारागृहांमध्ये रुग्ण, मुले तसेच कैद्यांना फळे व खाद्यपदार्थांचे पॅकेट वितरित केले जात आहेत. तसेच नागरिकांच्या सेवेसाठी मोफत वैद्यकीय शिबिरे आणि रक्तदान शिबिरे यांसारखे सामाजिक उपक्रमही राबविण्यात येत आहेत. याशिवाय पैगंबर-ए-इस्लाम यांच्या न्याय, प्रेम, दया आणि मानवतेच्या संदेशाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने विविध शहरांमध्ये मोठे होर्डिंग्ज व बॅनर्स लावण्यात येत आहेत. GNRF चे जिल्हाध्यक्ष रफीक रोशन यांनी सांगितले की, या सामाजिक सेवांचा उद्देश समाजामध्ये बंधुभाव, सहानुभूती, मानवता आणि सेवाभाव वाढविणे हा आहे. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत मदत व मानवतेचा संदेश पोहोचविण्यासाठी हे उपक्रम राबविण्यात येत आहेत. हा सामाजिक उपक्रम यशस्वी करण्यासाठी शोएब अत्तारी, अब्दुल सईद, सय्यद साबीर, युसूफ खान, हाजी तनवीर, फरीद शेख, आबिद शेख, अली शेख, अहमद रजा, शेख कारी इद्रीस, अबू सलीम, मौलाना झुल्फिकार, दानिश कुरेशी आणि हाफिज कासिम यांच्यासह GNRF स्वयंसेवकांनी विशेष प्रयत्न केले.



