भुसावळ (प्रतिनिधी) : आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भाविक व प्रवाशांच्या वाढत्या गर्दीचे प्रभावी नियोजन करण्यासाठी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक श्री. राजीव श्रीवास्तव यांनी दिनांक २२ ऑगस्ट २०२६ रोजी भुसावळ विभागातील प्रमुख रेल्वे स्थानकांची पाहणी करून विविध तयारीचा आढावा घेतला. या पाहणी दौऱ्यात देवळाली, नाशिक रोड, ओढा, कसबे सुकेणे आणि खेरवाडी या प्रमुख स्थानकांचा समावेश होता. पाहणीदरम्यान श्री. श्रीवास्तव यांनी प्रवाशांच्या सुविधा, पायाभूत सुविधा, सुरक्षा व्यवस्था, गर्दीचे नियोजन, प्रवाशांची ये-जा तसेच आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याच्या तयारीचा सविस्तर आढावा घेतला. कुंभमेळ्यादरम्यान अपेक्षित असलेली भाविक व प्रवाशांची मोठी गर्दी लक्षात घेता सर्व आवश्यक व्यवस्था सज्ज असल्याची खात्री करणे हा या पाहणीचा प्रमुख उद्देश होता. प्रवाशांची सुरक्षित व सुरळीत ये-जा सुनिश्चित करण्यासोबतच गर्दीचे प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजनांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले. या पाहणी दौऱ्यावेळी भुसावळ विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्री. पुनीत अग्रवाल यांच्यासह विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.



