भुसावळातील टीव्ही टॉवर परिसरात धान्य व्यापाऱ्यावर सशस्त्र हल्ला; डोळ्यात मिरची पूड फेकून दोन लाखांहून अधिक रक्कम लुटली : दांडक्याने मारहाणीत व्यापाऱ्याच्या मेंदूला गंभीर इजा; बेशुद्धावस्थेत जळगावला हलविले ; तिघे लुटारू सीसीटीव्हीत कैद होण्याची शक्यता ;

भुसावळ (प्रतिनिधी) : भुसावळ शहरातील टीव्ही टॉवर परिसरात सोमवारी रात्री धान्य व्यापाऱ्यावर हल्ला करून दोन लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम लुटल्याची धक्कादायक घटना घडली. दुकान बंद करून पुतण्यासोबत दुचाकीने घरी जात असलेल्या अजय प्रेमचंद कोटेचा (वय ५०) यांच्या डोळ्यात तिघा लुटारूंनी मिरची पूड फेकली. त्यानंतर लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून त्यांच्याजवळील रोकड असलेली पिशवी हिसकावून तिघे दुचाकीवरून पसार झाले.

या मारहाणीत कोटेचा यांच्या डोक्याला व मेंदूला गंभीर दुखापत झाली. त्यांना रात्री साडेअकराच्या सुमारास बेशुद्धावस्थेत जळगाव येथील न्यूरो सर्जनकडे उपचारासाठी हलविण्यात आले.

दुकान बंद करून घरी जात असताना हल्ला

अजय कोटेचा हे अण्णा भाऊ साठे मार्केटमधील धान्याचे दुकान सोमवारी रात्री सुमारे ८.५० वाजता बंद करून पुतण्या मीत कोटेचा (वय १९) याच्यासोबत दुचाकीने टीव्ही टॉवर परिसरातील आपल्या घराकडे निघाले होते. रात्री सुमारे ९ वाजता भूमी अभिलेख कार्यालयासमोर पोहोचले असता दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्यांचा पाठलाग केला.

या परिसरातील काही पथदिवे बंद असल्याने अंधाराचा फायदा घेत लुटारूंनी अचानक कोटेचा यांच्या डोळ्यात मिरची पूड फेकली. त्यामुळे त्यांना काहीच दिसेनासे झाले. त्याचवेळी तिघांनी लाकडी दांडक्याने त्यांच्यावर हल्ला केला आणि दोन लाखांपेक्षा अधिक रोकड असलेली पिशवी बळजबरीने हिसकावून घेतली. त्यानंतर तिघे दुचाकीवरून पसार झाले.

मारहाणीत मेंदूला गंभीर इजा

लुटारूंच्या हल्ल्यात कोटेचा यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने रात्री साडेअकराच्या सुमारास त्यांना बेशुद्धावस्थेत जळगाव येथे न्यूरो सर्जनकडे हलविण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच शहरातील अनेक व्यापाऱ्यांनी रुग्णालय परिसरात गर्दी केली. रस्तालुटीच्या या घटनेबद्दल व्यापाऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.

आधी रेकी, नंतर अंधाराचा फायदा?

लुटारूंनी कोटेचा यांच्या हालचालींवर आधीपासून पाळत ठेवली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे. ते दररोज कोणत्या मार्गाने दुकान बंद करून घरी जातात, याची माहिती घेतल्यानंतर लुटीचा कट आखण्यात आला असावा. घर आणि दुकान भरवस्तीत असल्याने तेथे लूट करणे धोकादायक ठरेल, हे लक्षात घेऊन पथदिवे बंद असलेल्या टीव्ही टॉवर परिसरातील ठिकाणाची निवड करण्यात आली असावी.

२०२१ मध्येही अशाच पद्धतीने लूट

२० एप्रिल २०२१ रोजी साकेगाव शिवारात भाजीपाला व्यापारी विनोद परदेशी यांच्यासोबतही अशाच प्रकारची घटना घडली होती. दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्यांचा पाठलाग करून डोळ्यात मिरची पूड फेकली होती. त्यानंतर त्यांच्या अंगावरील दोन सोनसाखळ्या आणि खिशातील ७५ हजार रुपये असा सुमारे तीन लाख रुपयांचा ऐवज लुटून लुटारू पसार झाले होते.

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास

घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी केदार बारबोले, बाजारपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक राहुल वाघ आणि डीबी पथकाने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. लुटारूंचा माग काढण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले जाणार आहे. तिघे प्रत्यक्ष हल्ल्यात सहभागी असले तरी त्यांचे अन्य साथीदार आहेत का, याचाही तपास केला जात आहे.

लुटारूंच्या वाहनाची माहिती, त्यांच्या हालचाली आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिस तपास सुरू असून, शहरात येणाऱ्या-जाणाऱ्या प्रमुख मार्गांसह आडमार्गांवरही पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत लक्ष ठेवले. शहरातील गस्त वाढविण्यात आली आहे.

“मोडस ऑपरेंडीच्या आधारे तपास करण्यात येत आहे. या विभागात अशाच पद्धतीने झालेल्या रस्तालुटीच्या घटनांची माहिती घेत आहोत. त्यातून काही संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात येईल.” — केदार बारबोले, डीवायएसपी, भुसावळ
फोटो.... एआयइमेज