सरदार पटेलांच्या जीवनकार्याला नाटिकेतून उजाळा; भुसावळात प्रतिष्ठा महिला मंडळाचा स्तुत्य उपक्रम ;

भुसावळ (प्रतिनिधी ) - देशाची एकता, अखंडता आणि राष्ट्रहितासाठी आयुष्य समर्पित करणारे भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनकार्याला भुसावळातील प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून नाटिकेच्या माध्यमातून उजाळा देण्यात आला. प्रोफेसर कॉलनीतील संतोषी माता सभागृहात रविवार, दि. १६ ऑगस्ट रोजी सायंकाळी सरदार पटेल यांच्या जीवनचरित्रावर आधारित नाटिका सादर करण्यात आली. कलाकारांच्या प्रभावी अभिनयातून त्यांच्या संघर्षमय जीवनप्रवासासह देशहितासाठी केलेल्या अतुलनीय कार्याचे सजीव दर्शन उपस्थितांना घडले.

ऐतिहासिक कार्याचा प्रभावी जागर

सरदार वल्लभभाई पटेल यांनी स्वातंत्र्यलढ्यात बजावलेली महत्त्वपूर्ण भूमिका, देशाच्या एकतेसाठी घेतलेले कठोर निर्णय आणि स्वातंत्र्यानंतर विविध संस्थानांचे भारतात विलीनीकरण करून अखंड भारताच्या निर्मितीसाठी केलेले ऐतिहासिक कार्य नाटिकेत प्रभावीपणे मांडण्यात आले.

स्वातंत्र्य चळवळीतील त्यांचे योगदान, देशाचे पहिले उपपंतप्रधान व गृहमंत्री म्हणून त्यांनी स्वीकारलेली जबाबदारी, तसेच राष्ट्रउभारणीच्या काळात आलेल्या विविध अडचणींचे भावपूर्ण आणि सजीव चित्रण कलाकारांनी केले.

देशाच्या एकीकरणाचा प्रसंग ठरला विशेष प्रभावी

देशाची एकता आणि अखंडता टिकविण्यासाठी सरदार पटेल यांनी घेतलेली ठाम भूमिका आणि त्यांचे कार्यक्षम नेतृत्व नाटिकेतून अधोरेखित करण्यात आले. अनेक आव्हानांना सामोरे जात त्यांनी देशाच्या एकीकरणासाठी केलेले प्रयत्न सादर करणारा प्रसंग विशेष प्रभावी ठरला. या सादरीकरणाला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात उत्स्फूर्त दाद दिली.

प्रतिष्ठा महिला मंडळाच्या या उपक्रमातून नव्या पिढीला सरदार पटेल यांचे विचार, राष्ट्रनिष्ठा आणि देशहिताला सर्वोच्च प्राधान्य देणारे कार्य समजावे, हा संदेश देण्यात आला.

देशभक्तीपर गीतांनी रंगत

कार्यक्रमाच्या प्रारंभी युफोरिया भुसावळ टीमने देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण केले. देशभक्तीच्या भावनेने भारलेल्या या गीतांनाही उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

मान्यवरांची उपस्थिती

कार्यक्रमाला महामंडलेश्वर जनार्दन महाराज, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, प्रभारी नगराध्यक्षा शैलजा नारखेडे, डीवायएसपी केदार बारबोले, बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल वाघ, शहर पोलीस निरीक्षक महेश गायकवाड, महिला समुपदेशक आरती चौधरी, डॉ. संगीता बियाणी, उद्योजक मनोज बियाणी, भुसावळ बाजार समितीचे सभापती अनिल वारके, नगरसेविका, नगरसेवक तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.


गौरवशाली इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे कार्य : जनार्दन महाराज

आशीर्वचनात महामंडलेश्वर जनार्दन महाराज म्हणाले की, आजच्या तरुणाईला आपल्या प्राचीन व गौरवशाली इतिहासाची पुरेशी माहिती नसते. प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या उपक्रमांमुळे आजच्या पिढीला देशाचा इतिहास आणि महान पुरुषांचे कार्य समजण्यास मदत होत आहे. महान पुरुष आणि स्वातंत्र्यसैनिकांची ओळख भावी पिढीला करून देण्याचे हे कार्य कौतुकास्पद आहे.

मंत्री संजय सावकारे यांचा सामाजिक उपक्रमांना नेहमीच पाठिंबा असतो. शहरातील विविध मंडळे आणि सामाजिक संस्थांच्या उपक्रमांना ते देत असलेले सहकार्य इतरांसाठी प्रेरणादायी असल्याचेही त्यांनी नमूद केले.

कलावंतांना व्यासपीठ, स्थानिकांना रोजगार : रजनी सावकारे

प्रास्ताविकात प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे यांनी मंडळाच्या उपक्रमामागील उद्देश स्पष्ट केला. देशातील थोर पुरुषांचा इतिहास आजच्या पिढीला कळावा, या उद्देशाने अशा कार्यक्रमांचे आयोजन केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

नाटिकेच्या माध्यमातून स्थानिक कलावंतांना हक्काचे व्यासपीठ मिळते. त्याचबरोबर कोरिओग्राफी, कॉश्च्युम, नेपथ्य व विविध साहित्याची आवश्यकता असल्याने स्थानिकांना रोजगाराच्या संधीही उपलब्ध होतात. इतिहासाला उजाळा देण्याचे हे कार्य यापुढेही अविरत सुरू राहील, असे रजनी सावकारे यांनी सांगितले.

प्रतिष्ठा महिला मंडळाचा उपक्रम स्तुत्य : डीवायएसपी केदार बारबोले

डीवायएसपी केदार बारबोले यांनी सरदार पटेल यांच्या जीवनावर आधारित नाटिकेचे अतिशय उत्तम पद्धतीने सादरीकरण झाल्याचे नमूद केले. सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून प्रतिष्ठा महिला मंडळ अग्रेसर असल्याचे सांगत त्यांनी मंडळाच्या कार्याचे कौतुक केले.

कलाकारांनी साकारल्या प्रभावी भूमिका

नाटिकेत सरदार वल्लभभाई पटेल यांची भूमिका डॉ. मकरंद चांदवडकर, तर पंडित जवाहरलाल नेहरू यांची भूमिका डॉ. समीर चौधरी यांनी साकारली. सुधीर तायडे यांनी व्ही. पी. मेनन यांची, तर सागर पाटील व आकाश शेंडे यांनी नवाबांची भूमिका वठवली. नाटकातील संवादांचे प्रभावी सादरीकरण संजय चांडक यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रतिष्ठा महिला मंडळाच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.