भुसावळ, सोमवार, १७ ऑगस्ट २०२६ | (प्रतिनिधी ) - भुसावळ रेल्वे यार्डातील रेल्वे यार्ड पोलीस ठाण्यालगत असलेल्या एका गोदामात गळफास घेतलेल्या अवस्थेत पुरुषाचा कुजलेला मृतदेह आढळल्याने रविवारी सायंकाळी खळबळ उडाली. मृताच्या खिशातील कागदपत्रांवरून त्याची ओळख वर्धा जिल्ह्यातील ठाणेगाव येथील योगेश विजय वाघधरे (वय २३) अशी पटली आहे. प्राथमिक माहितीनुसार, योगेश हा १२ जुलै रोजी उज्जैन येथे जाणार असल्याचे सांगून घरातून बाहेर पडला होता. मात्र, तो उज्जैनलाही पोहोचला नाही आणि घरीदेखील परतला नाही. त्यामुळे त्याचे वडील विजय वाघधरे यांनी १८ जुलै रोजी कारंजा पोलिसांत तो हरवल्याची नोंद केली होती. त्यानंतर महिनाभराने त्याचा मृतदेह भुसावळ रेल्वे यार्डात आढळून आला. गोदामात गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह रेल्वे यार्ड परिसरातील पोलीस ठाण्यालगत असलेल्या गोदामात एका व्यक्तीने गळफास घेतल्याची माहिती रविवारी सायंकाळी समोर आली. मृतदेह बराच काळ तेथे असल्याने कुजलेल्या अवस्थेत होता. घटनास्थळ कोणत्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत येते, याबाबत सुरुवातीला बाजारपेठ व लोहमार्ग पोलिसांमध्ये संभ्रम निर्माण झाला. त्यानंतर रात्री उशिरा भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. मृतदेहाच्या स्थितीमुळे पोलिसांसमोर ओळख पटविण्याचे आव्हान होते. मात्र, मृताच्या पॅन्टच्या खिशात असलेल्या पाकिटामध्ये आधारकार्ड, पॅनकार्ड आणि फोटो आढळून आले. या कागदपत्रांच्या आधारे मृताची ओळख योगेश वाघधरे अशी निश्चित झाली. महिनाभरापासून होता बेपत्ता योगेश वाघधरे हा वर्धा जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील ठाणेगाव येथील रहिवासी होता. १२ जुलै रोजी उज्जैनला जात असल्याचे सांगून तो घराबाहेर पडला होता. मात्र, त्यानंतर त्याचा कुटुंबीयांशी संपर्क झाला नाही. तो घरी परत न आल्याने वडील विजय वाघधरे यांनी १८ जुलै रोजी कारंजा पोलिसांत हरवल्याची नोंद केली होती. आता भुसावळ रेल्वे यार्डात त्याचा मृतदेह आढळल्याने या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. आत्महत्येमागील कारणाचा शोध सुरू भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी विजय वाघधरे यांच्याशी संपर्क साधून त्यांना भुसावळ येथे बोलावले आहे. मृतदेहाची ओळख पटविल्यानंतर पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. योगेशने नेमके कोणत्या कारणातून हे टोकाचे पाऊल उचलले? तो उज्जैनला जाण्याऐवजी भुसावळ रेल्वे यार्डात कसा पोहोचला? यामागे अन्य काही कारण आहे का? या सर्व बाबींचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूबाबतच्या महत्त्वाच्या बाबी स्पष्ट होण्याची शक्यता आहे. या प्रकरणाचा पुढील तपास भुसावळ बाजारपेठ पोलीस करीत आहेत.


