सराफाच्या दुकानातून हातचलाखीने सोन्याची चोरी; फरार आरोपी अकोल्यातून ताब्यात

भुसावळ (प्रतिनिधी) - सराफाच्या दुकानातून हातचलाखीने सोन्याचा मुद्देमाल लंपास करून फरार झालेल्या आरोपीस जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अकोला शहरातून ताब्यात घेतले. मोहम्मद अली लियाकत अली सय्यद (वय ३८, रा. पापा नगर, खडका रोड, इरणी वस्ती, भुसावळ) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून दोन गुन्ह्यांतील ४७.४८ ग्रॅम सोने, सुमारे ४ लाख ९५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १२९/२०२६ तसेच बोदवड पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १२८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अंतर्गत आरोपीविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले होते. दोन्ही गुन्ह्यांमध्ये आरोपी फरार होता. त्याचा शोध स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घेत होते.

गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी अकोला शहरात असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अकोला येथे सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने सराफाच्या दुकानातून हातचलाखीने सोन्याचा मुद्देमाल चोरल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्याकडून दोन्ही गुन्ह्यांतील एकूण ४७.४८ ग्रॅम सोने, अंदाजे ४ लाख ९५ हजार रुपये किमतीचे, हस्तगत करण्यात आले.

ही कारवाई पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलिस अधिकारी केदार बारबोले व परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक प्रशांत दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

कारवाईत पोलिस उपनिरीक्षक संतोष पवार, पोलिस हवालदार उमाकांत पाटील, गोपाळ गव्हाळे, पोलिस नाईक विकास सातदिवे, पोलिस कॉन्स्टेबल प्रशांत परदेशी, राहुल वानखेडे, पोलिस हवालदार संदीप चव्हाण, चालक पोलिस कॉन्स्टेबल रिप्ततान भेग्व तसेच तांत्रिक मदतीसाठी पोलिस कॉन्स्टेबल गौरव पाटील व मिलिंद जाधव यांनी सहभाग घेतला.

अटक आरोपीस पुढील कायदेशीर कारवाईसाठी भुसावळ तालुका पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस हवालदार विकास यशवंज बाविस्कर करीत आहेत.