भुसावळ (प्रतिनिधी) - तालुक्यातील फुलगाव येथे एकाने राहत्या घरात साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी सायंकाळी उघडकीस आली. तर पिंपळगाव खुर्द येथील शेती शिवारातील धानोरी रस्त्यावरील झाडाला दोरी बांधून एका अनोळखी व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले. वरणगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फुलगाव येथील रहिवासी तुषार उर्फ ताणिया (किन्नर) अनंत बावस्कर (३१) हा १६ ऑगस्ट रोजी सायंकाळी जेवणासाठी भाजी बनवून, ‘मला भूक लागली आहे, लवकर पोळ्या बनव,’ असे आईला सांगून घराच्या वरच्या मजल्यावरील खोलीत गेला. पोळ्या तयार झाल्यानंतर आईने तुषारला जेवणासाठी हाक मारली. मात्र, वरच्या मजल्यावरील खोलीतून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने आईने वर जाऊन पाहिले असता तुषारने छताच्या पंख्याला साडी बांधून गळफास घेतल्याचे आढळून आले. तुषारच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकलेले नाही. याबाबत मयताची आई रेखा अनंत बावस्कर यांच्या खबरीवरून वरणगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश राठोड व ईश्वर तायडे करीत आहेत.


