भुसावळ (प्रतिनिधी) - आज दिनांक 16 ऑगस्ट रविवार रोजी रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेल सिटी, इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ रेल सिटी व कृषी विभाग भुसावळ तालुका महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने रानभाजी महोत्सव अत्यंत उत्साहात पार पडला. या महोत्सवात सुमारे 28 विक्रेते जळगाव जिल्ह्यातील वेग वेगळ्या वनभागातून आपली संकलित केलेली रानभाजी,तयार पदार्थ विक्रीसाठी घेऊन आले होते. भुसावळकरांनी सकाळी नऊ वाजेपासून दुपारी दोन वाजेपर्यंत या संपूर्ण रानभाजींचा आस्वाद घेतला व खरेदी पण केली. या प्रसंगी उद्घाटन करताना मा. ना.संजय भाऊ सावकारे, वस्त्रोद्योग मंत्री,महाराष्ट्र राज्य यांनी असे प्रतिपादन केले की श्रावण महिना सुरू झाल्यानंतर या सर्व रानभाजी नैसर्गिक पद्धतीने उगत असतात.यांचे सेवन केल्याने आपल्या शरीरातील विविध कमतरता पूर्ण होण्यास मदत होते.मांसाहार टाळण्यासाठी अत्यंत चांगला पर्याय म्हणून आपण वन भाजी, रानभाजी यांच्याकडे बघू शकतो तरी सर्वांनी या रानभाज्यांची खरेदी करावी असे आवाहन केले.या प्रसंगी भुसावळ तालुका कृषी विभाग प्रमुख श्री ऋषिकेश चौधरी टेक्निकल डायरेक्टर श्री प्रमोद जाधव,रोटरी रेल सिटी चे अध्यक्ष सुयश न्याती सेक्रेटरी डॉ राहुल पांडे तसेच इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा सौ योगिता वायकोळे,सेक्रेटरी सौ कविता पाचपांडे तसेच रोटरी रेल सिटी चे सदस्य तसेच इनरव्हील रेल सिटी चे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते या सर्व कार्यक्रमाचे नियोजन प्रकल्प प्रमुख रो.श्री सोनू मांडे व उपप्रमुख रो. श्री अविनाश वारके यांनी केले.



