भुसावळ प्रतिनिधी : आयुध निर्माणी वरणगावच्या कर्मचारी वसाहतीत शनिवारी (दि. ८ ऑगस्ट) रात्री साडेनऊच्या सुमारास बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिक आणि कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. क्वॉर्टर क्रमांक ३, टाईप-२ परिसराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पुलाच्या कठड्यावर बिबट्या बसलेला आढळून आला. कर्मचारी प्रविण चौधरी यांनी हा बिबट्या आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला. आयुध निर्माणी वरणगावच्या कर्मचारी वसाहतीतील अनेक निवासस्थाने सध्या रिक्त आहेत. कर्मचारी संख्या कमी झाल्यामुळे काही क्वॉर्टर्सचा वापर होत नसल्याने त्यांच्या परिसरात झाडे, झुडपे तसेच काटेरी वनस्पती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. दाट झाडी आणि निर्मनुष्य परिसरामुळे वन्यप्राण्यांना लपण्यासाठी अनुकूल जागा उपलब्ध होत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या काही महिन्यांपासून वरणगाव फॅक्टरी वसाहतीत बिबट्याचा वावर असल्याचे काही कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. यापूर्वीही परिसरात बिबट्याच्या हालचाली जाणवल्याचे तसेच त्याच्या अस्तित्वाच्या काही खुणा आढळल्याचे कर्मचारी सांगतात. मात्र, शनिवारी रात्री बिबट्या थेट पुलाच्या कठड्यावर बसलेला दिसल्याने परिसरातील नागरिकांमध्ये पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. वसाहतीतील दाट झाडी आणि वाढलेल्या गवत-झुडपांची साफसफाई करून वन्यप्राण्यांना लपण्यासाठी असलेली ठिकाणे कमी करावीत, अशी मागणी नागरिक व कर्मचाऱ्यांकडून होत आहे. तसेच बिबट्याचा नेमका वावर कोणत्या भागात आहे, याचा शोध घेऊन आवश्यक ती खबरदारी घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे. बिबट्याचे प्रत्यक्ष दर्शन झाल्याने कर्मचारी वसाहतीतील नागरिकांनी रात्रीच्या वेळी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत असून, वनविभागाने या परिसराची पाहणी करून आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


