भुसावळ ( प्रतिनिधी ) - रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना निर्धारित दरात दर्जेदार खाद्यपदार्थ व पेये उपलब्ध करून देण्यासाठी मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाकडून खानपान स्टॉल, ट्रॉली विक्रेते तसेच अधिकृत विक्रेत्यांची नियमितपणे आकस्मिक तपासणी करण्यात येत आहे. प्रवाशांकडून पाण्याच्या बाटल्या, खाद्यपदार्थ तसेच पेयांसाठी निर्धारित कमाल किरकोळ किंमतीपेक्षा (MRP) अधिक रक्कम आकारली जात असल्याच्या तक्रारी रेल्वे मदतवर प्राप्त होतात. यासोबतच इतर व्यावसायिक अनियमितता रोखण्यासाठी वाणिज्य विभागाकडून स्थानकांवर अचानक तपासण्या केल्या जात आहेत. तपासणीदरम्यान कोणताही विक्रेता निर्धारित दरापेक्षा जास्त रक्कम आकारताना किंवा अन्य व्यावसायिक अनियमितता करताना आढळल्यास, त्याच्याविरुद्ध रेल्वेच्या प्रचलित नियमांनुसार तत्काळ दंडात्मक कारवाई केली जाते. गरजेनुसार आर्थिक दंडासोबतच इतर शिस्तभंगाची कारवाईही करण्यात येते. एप्रिल २०२६ ते जुलै २०२६ या कालावधीत अशा अनियमिततेप्रकरणी मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाच्या वाणिज्य विभागाने संबंधित विक्रेत्यांवर कारवाई करत एकूण ₹७ लाख १० हजारांचा दंड वसूल केला आहे. प्रवाशांच्या हितांचे संरक्षण, ग्राहकांच्या अधिकारांचे जतन तसेच निर्धारित दरात आवश्यक वस्तू उपलब्ध करून देण्यासाठी भुसावळ विभागाकडून नियमित देखरेख, आकस्मिक तपासणी आणि प्रभावी अंमलबजावणीची कारवाई सातत्याने सुरू ठेवण्यात आली आहे. अनियमितता आढळल्यास तक्रार करा रेल्वे स्थानकावर किंवा रेल्वेगाडीत कोणत्याही वस्तूसाठी निर्धारित दरापेक्षा अधिक रक्कम आकारली जात असल्यास किंवा अन्य प्रकारची अनियमितता आढळल्यास प्रवाशांनी रेल्वे मदतच्या माध्यमातून तत्काळ तक्रार नोंदवावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तक्रारीच्या आधारे संबंधित प्रकरणाची त्वरित चौकशी करून आवश्यक ती कारवाई केली जाणार आहे. फोटो...संग्रहित /काल्पनिक


