मध्य रेल्वे भुसावळ विभागाच्या आरपीएफची मोठी कारवाई; ‘ऑपरेशन प्रवासी सुरक्षा’ अंतर्गत दोन मोबाईल चोर ताब्यात, चोरीचे दोन मोबाईल जप्त

भुसावळ (प्रतिनिधी) : रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेसह त्यांच्या मालमत्तेचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने मध्य रेल्वे, भुसावळ विभागाच्या रेल्वे सुरक्षा दलामार्फत (RPF) राबविण्यात येत असलेल्या ‘ऑपरेशन प्रवासी सुरक्षा’ अंतर्गत महत्त्वपूर्ण यश मिळाले आहे. आरपीएफ भुसावळने मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये सहभागी असलेल्या दोन संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून चोरीचे दोन मोबाईल फोन जप्त केले आहेत. जप्त करण्यात आलेल्या मोबाईलची एकूण किंमत ₹30 हजार 500 इतकी आहे.

दि. 29 जुलै 2026 रोजी भुसावळ सीपीडीएस ड्युटीवर कार्यरत असलेले प्रधान आरक्षक महेंद्र कुशवाहा, प्रधान आरक्षक इमरान खान, आरक्षक भूषण पाटील, आरक्षक विकास गुर्जर तसेच आरक्षक कपिल कुमार (सीआयबी/भुसावळ) हे भुसावळ रेल्वे स्थानकाच्या डाउन आउटर परिसरात गस्त घालत होते. यावेळी त्यांना दोन व्यक्ती संशयास्पद अवस्थेत फिरताना आढळून आल्या. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी आपल्या उपस्थितीबाबत समाधानकारक उत्तर दिले नाही. त्यामुळे पुढील चौकशीसाठी दोघांनाही आरपीएफ पोस्ट, भुसावळ येथे आणण्यात आले.

आरपीएफ पोस्ट भुसावळचे उपनिरीक्षक सुदामा यादव यांनी दोन्ही संशयितांची सखोल चौकशी केली. त्यानंतर दोन पंचांच्या उपस्थितीत त्यांच्या अंगझडतीदरम्यान एका व्यक्तीकडून वनप्लस नॉर्ड कंपनीचा मोबाईल फोन, अंदाजे किंमत ₹20 हजार 500, तर दुसऱ्या व्यक्तीकडून सॅमसंग गॅलेक्सी A06, स्काय ब्ल्यू रंगाचा मोबाईल फोन, अंदाजे किंमत ₹10 हजार, जप्त करण्यात आला. अशाप्रकारे एकूण ₹30 हजार 500 किमतीचे दोन मोबाईल फोन आरपीएफने ताब्यात घेतले.

चौकशीदरम्यान दोन्ही आरोपींनी भुसावळ रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या रेल्वे गाड्यांमधून हे मोबाईल फोन चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर पुढील कायदेशीर कारवाईसाठी दोन्ही आरोपींना जीआरपी, भुसावळ यांच्या ताब्यात देण्यात आले.

जप्त करण्यात आलेल्या वनप्लस मोबाईल संदर्भात यापूर्वी अज्ञात व्यक्तीविरुद्ध नोंदविण्यात आलेल्या सीआर क्रमांक 509/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 305(सी) नुसार कारवाई करण्यात आली आहे. तसेच जप्त करण्यात आलेल्या सॅमसंग गॅलेक्सी A06 मोबाईल संदर्भातही स्वतंत्र गुन्हा नोंदवून पुढील कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.

 भुसावळ विभागाचे रेल्वे सुरक्षा दल प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी, रेल्वे परिसरातील गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी आणि सुरक्षित रेल्वे वातावरण निर्माण करण्यासाठी सातत्याने दक्षता व प्रभावी कार्यवाही करीत आहे.

प्रवाशांनी रेल्वे प्रवासादरम्यान आपल्या सामानाची व मोबाईलची काळजी घ्यावी. तसेच कोणतीही संशयास्पद हालचाल अथवा घटना निदर्शनास आल्यास तात्काळ रेल्वे सुरक्षा दलाशी संपर्क साधावा किंवा रेल्वे हेल्पलाइन क्रमांक 139 वर माहिती द्यावी, असे आवाहन आरपीएफतर्फे करण्यात आले आहे.