श्री विठ्ठल नामाच्या गजरात भुसावळातून विशेष रेल्वे पंढरपूरकडे रवाना ; केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते हिरवा झेंडा; शेकडो वारकऱ्यांचा भक्तिमय प्रवास

भुसावळ (प्रतिनिधी) : ‘ज्ञानोबा-तुकाराम’, ‘पुंडलिक वरदा हरी विठ्ठल’च्या जयघोषात आणि श्री विठ्ठल नामाच्या गजरात पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी भुसावळहून विशेष आषाढी रेल्वे शुक्रवारी (दि. २४) दुपारी भक्तिमय वातावरणात रवाना झाली. केंद्रीय युवा व्यवहार व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या प्रयत्नातून जळगाव, बुलढाणा जिल्ह्यासह परिसरातील शेकडो वारकऱ्यांसाठी या विशेष रेल्वेची व्यवस्था करण्यात आली होती.

विशेष गाडी क्रमांक ०११५९ पंढरपूरकडे रवाना होण्यापूर्वी भुसावळ रेल्वे स्थानक परिसरातून वारकऱ्यांची दिंडी काढण्यात आली. यामध्ये केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे यांच्यासह वारकरी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले. दुपारी सुमारे दोन वाजता केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे आणि भुसावळ विभागाचे अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक प्रवीण कुमार पाठक यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून विशेष रेल्वेला रवाना करण्यात आले.

वारकऱ्यांसाठी मोफत अनारक्षित रेल्वे सुविधा

दरवर्षीप्रमाणे यंदाही मंत्री रक्षा खडसे यांच्या माध्यमातून पंढरपूर वारीचे आयोजन करण्यात आले आहे. वारकऱ्यांसाठी ही अनारक्षित विशेष रेल्वे मोफत ठेवण्यात आली असून, रेल्वेतील जनरल तिकिटांची खरेदी मंत्री रक्षा खडसे यांनी स्वखर्चाने केली आहे. यावेळी त्यांनी पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधत त्यांना शुभेच्छा दिल्या.

शनिवारी पहाटे पंढरपूरला पोहोचणार

भुसावळहून रवाना झालेली विशेष आषाढी रेल्वे शनिवार, दि. २५ जुलै रोजी पहाटे ३.३० वाजता पंढरपूर येथे पोहोचणार आहे. त्यानंतर शनिवारी रात्री १०.३० वाजता ही गाडी पंढरपूरहून परतीच्या प्रवासाला रवाना होऊन रविवार, दि. २६ जुलै रोजी भुसावळ येथे दाखल होणार आहे.

रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांच्या सोयीसाठी विशेष व्यवस्था

पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी विशेष गाडीची व्यवस्था केली. सर्व प्रवाशांनी सुरक्षितपणे आपल्या डब्यांमध्ये प्रवेश केला असून, गाडी नियोजित वेळेनुसार सुरळीतपणे रवाना झाली.

यावेळी प्रभारी नगराध्यक्षा शैलजा नारखेडे, प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे, डॉ. राजेंद्र फडके, नगरसेवक पिंटू कोठारी, भाजपा पदाधिकारी परीक्षीत बऱ्हाटे, मुरलीधर (गोलू) पाटील यांच्यासह रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी, झेडआरयूसीसी सदस्य, स्थानक व्यवस्थापक, मुख्य वाणिज्य निरीक्षक आणि कर्मचारी उपस्थित होते.

चौकट

भुसावळ-पंढरपूर विशेष आषाढी रेल्वे

गाडी क्रमांक ०११५९ दि. २४ जुलै २०२६ रोजी भुसावळ स्थानकावरून भक्तिमय वातावरणात रवाना झाली. केंद्रीय युवा व्यवहार व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि भुसावळ विभागाचे अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक प्रवीण कुमार पाठक यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून गाडीला रवाना करण्यात आले. आषाढी वारीसाठी जाणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाने ही विशेष गाडी उपलब्ध करून दिली आहे.