भुसावळ (प्रतिनिधी )-
काल-परवापर्यंत 8-10 माणसांना ही जमावबंदीचा आदेश लावणारे शासन आज शेकडो लहान मुलांना शाळा नावाच्या मृत्यूगृहात का कोंबत आहे? आज राज्यात अनेक शिक्षकांना, मुलांना ही कोरोनाने ग्रासले आहे. शाळा बंद असताना ही अश्या घटना घडत आहेत मग शाळा सुरू केल्यावर किती भयंकर चित्रं समोर येईल ह्याची कल्पनाही करवत नाही. शाळा आताच सुरू करण्याची गरज आहे का ? असा प्रश्न प्र.ह.दलाल यांनी उपस्थित केला आहे.
शिकणे नव्हे तर जगणे महत्त्वाचे
आता शाळा सुरू करण्याची गरज नाही तर त्यांना घरीच आनंदाने व सुरक्षित राहु देण्याची असल्याचे दलाल यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. मुलांना घरीच आनंदाने, सुरक्षित राहू द्या ना. त्यांचे शिकणे नव्हे तर जगणे महत्वाचे आहे. उगाच त्यांच्या जिवाशी राक्षसी खेळ खेळूनये तसेच शाळा सुरू करण्यापूर्वी इतर दुष्पपरीणामांचा शांत डोक्याने विचार करावा तसेच जगातील विविध क्षेत्रात उत्तुंग भरारी घेणार्या अनेक यशस्वी लोकही काही कारणांनी लहानपणी शालेय शिक्षणापासून वंचित राहिले आहेत. पण शेवटी ते यशस्वी झालेच ना? आज आपल्या हजारो शाळांची सत्य स्थिती काय आहे हे तर बघा ना! शंभर मुलांनाही एकच मुतारी तीही मोडकी तोडकी, अनेक शाळांमधे पिण्याच्या पाण्याचा अभाव असून एकच माठ, दोन-तीन ग्लास, पाण्यासाठी मधल्या सुटीत मुलांची होणारी सरीवळ, ढकलाढकली, मस्ती आणि लहान वर्ग खोलीत दाटीवाटीने बसणारी मुले! कस राखणार शारीरिक अंतर अन कुठे कुठे लावणार सॅनिटायझर ! खाजगी संस्था व शिक्षणाचा बाजार मांडून अफाट संपत्ती कमावणारे काही लोक स्वत:च्या लाभासाठी शाळा सुरू करायच्या व फी च्या नावाखाली अमाप पैसा लुटायचा आणि काही महिन्यांनी कोरोना-कोरोनाची आरोळी ठोकून पुन्हा शाळांना सुट्टी द्यायची असा डाव मांडण्या साठी शासनावर दबाव तर आणत नसेल ना? अशी शंकाही दलाल यांनी उपस्थित केली आहे. शासन ही निगरगट्ट, मुर्दाड व संवेदनाहीन झाले असेल तर सुजाण नागरीक, सुज्ञाण पालक आणि कर्तव्यदक्ष शिक्षक व त्यांच्या संघटनांनी एकत्र येऊन शासनाचा हा अघोरी डाव उधळून लावला पाहिजे, अन्यथा उद्या खूप उशीर झालेला असेल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.



