भुसावळ (प्रतिनिधी) : शहरात रिपरिप पावसानंतर जीर्ण व धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मागील आठवड्यात जाम मोहल्ल्यातील जीर्ण इमारत कोसळल्याची घटना घडली होती. या पार्श्वभूमीवर शहरात तब्बल ६० धोकादायक आणि २५० जीर्ण अशा एकूण ३१० इमारती असल्याची माहिती समोर आली आहे. यातील सुमारे २४० इमारतींमध्ये नागरिक वास्तव्यास असून, या इमारती रहिवासी तसेच रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांसाठी धोकादायक ठरू शकतात. शहरातील विठ्ठल मंदिर वॉर्ड, राम मंदिर वॉर्ड, जाम मोहल्ला, सराफ बाजार, जामनेर रोडलगतच्या वस्त्या, म्युनिसिपल पार्क, वकील गल्ली, कुलकर्णी प्लॉट, जुने सतारे, आगाखान वाडा आणि छत्रपती शिवाजी महाराज नगर आदी भागांत जुन्या व पडक्या इमारती मोठ्या संख्येने आहेत. पालिकेने या जीर्ण व धोकादायक इमारतींच्या मालकांना तसेच रहिवाशांना नोटिसा बजावून, धोकादायक इमारतींमधील रहिवास तातडीने इतरत्र स्थलांतरित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, अनेक घरमालक व भाडेकरूंनी या नोटिसांकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. धोक्याची सूचना देणारे फलक जीर्ण इमारतींजवळ नागरिकांच्या सुरक्षेसाठी धोक्याची सूचना देणारे फलक लावण्यात आले आहेत. पावसाळ्यात जीर्ण इमारतींमध्ये वास्तव्य करणे अधिक धोकादायक ठरू शकते. त्यामुळे रहिवाशांनी तातडीने सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावे, असे आवाहन पालिकेने केले आहे. ज्या धोकादायक इमारतींबाबत कोणताही न्यायालयीन वाद प्रलंबित नाही, अशा इमारतींवर पालिका व महसूल प्रशासनाकडून सुमोटो कारवाई करण्यात येणार असल्याचे नगरअभियंता अंकुश गोसावी यांनी सांगितले. २२ कुटुंबांना स्थलांतराची नोटीस साईचंद्र नगर परिसरात दोन इमारती कोसळल्याच्या घटनांनंतर पालिकेने २२ जणांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. काही रहिवाशांनी नोटिसा स्वीकारल्या नसल्याने त्यांच्या घरांच्या दरवाजांवर नोटिसा चिकटविण्यात आल्याची माहिती नगरअभियंता अंकुश गोसावी यांनी दिली. पावसाळ्यात जुन्या व धोकादायक इमारती कोसळण्याचा धोका वाढत असल्याने पालिकेने कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.


